कोल्हापूर :
घिसाड गल्ली येथील फटाका गोडाऊनला गुरुवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये गोडाऊनच्या शेजारी असणारी पाच ते सहा घरे जळून खाक झाली. प्रापंचीक साहित्य, कपडे, सोने, रोख रक्कम असे सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. अग्नीशमन दलाच्या 5 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेवून चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
याबाबत अधिक माहिती अशी, घिसाड गेल्ली येथील देशभुषण हायस्कूल समोर एक फटाक्याचे गोडावून आहे. या गोडावूनला गुरुवारी रात्री 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग अवघ्या काही मिनीटातच पसरु लागली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण करत, बाजूच्या पाच घरांना आगीने विळखा घातला. ही बाब नागरीकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती अग्नीशमन दलास दिली. आगीने काही वेळातच फटाका गोडावून शेजारी असणाऱ्या गणेश काळे, सुरेश चौगुले तसेच त्यांच्या पिछाडीस असणाऱ्या दस्तगीर मोमीन, जमीर पन्हाळकर, अन्सार मुल्लाणी यांच्या घरापर्यंत आग पोहोचली. तसेच गल्लीतील 50 हून अधिक तरुणांनी बचावकार्य राबविण्यास सुरुवात केली. आगीच्या लपेट्यात आलेल्या घरातील नागरीकांना प्रथम सुखरुप बाहेर काढण्यास सुरुवात केली. घरातील गॅस सिलेंडर तसेच काही प्रापंचीक साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपुरा पडला. अग्नीशमन दलाच्या महापालिका, टिंबर मार्केट, फुलेवाडी, कावळा नाका, प्रतिभानगर येथील अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. मुख्य अग्नीशमन अधीकारी मनिष रणभिसे, स्टेशन ऑफीसर दस्तगीर मुल्ला, जयवंत खोत, कांता बांदेकर यांच्यासह सुमारे 15 ते 20 जवान घटनास्थळी दाखल झाले. सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्यासह लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

- डोळ्यादेखत प्रापंचिक साहित्याचा कोळसा
फटाका गोडावूनला लागलेली आग आजूबाजूच्या घरांपर्यंत पसरली. जुनी व लाकडी घरे असल्यामुळे आग वेगाने पसरत होती. घरातील सर्वच साहित्य आगीच्या भक्षस्थनी येत होते. नागरीकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडत होते. काही वेळातच अग्नीशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यांनाही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे आले.
- आगीचे नेमके कारण अस्पष्ट
दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत उलस सुलट चर्चा सुरु होत्या. आगीचे नेमके कारण रात्री उशिरा पर्यंत समजू शकले नाही. फटाका गोडावूनमध्येच आग लागली की अन्य कोणत्या घरात आग लागून ती गोडावून पर्यंत पसरली याबाबतचा तपास सुरु आहे.

- शिलाई मशीन, फ्रिज, तिजोरीसह प्रापंचीक साहित्य खाक
या आगीमध्ये शिलाई मशीन, फ्रिज, बेड, तिजोरीसह सर्व प्रापंचीक साहित्य भस्मसात झाले. डोळ्यादेखत मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या संसाराची राख रांगोळी झाल्याने नागरीकांच्या डोळ्यात अश्रु तरळत होते. आता पुढे काय करायचे हाच सवाल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
- 4 ट्रक भरुन फटाके
फटाका गोडावूनला आग लागल्याची माहिती मिळताच गोडावूनचे मालक कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोडावून मधून 4 ट्रक भरुन फटाके बाजूला केले. तसेच शुक्रवारी सकाळी 1 ट्रक भरत असताना हा ट्रक पोलिसांनी थांबवून ताब्यात घेतला. याचा पंचनामा करण्याचे काम सुरु होते.

- घरासाठी आणलेली रोकड जळाली
जमीर पन्हाळकर हे रिक्षा व्यावसायीक आहेत. दोन भाउ आई वडीलांसह ते घिसाड गल्ली येथे राहतात. घिसाड गल्ली येथील घर अपुरे पडत असल्यामुळे ते नवीन घराचा शोध घेत होते. यासाठी दोनच दिवसांपूर्वी त्यांनी बँकेतून 7 लाख रुपयांची रोकड घरी आणून ठेवली होती. एका जर्मनच्या डब्यामध्ये ही रोकड ठेवली होती. आगीमध्ये या पैकी काही रक्कम जळून खाक झाली. तर काही रक्कम वाचविण्यात यश आले आहे.
- सोन्याचे दागिने वितळले
ट्रॅव्हल्स एजंट म्हणून काम करणाऱ्या अन्सार मुल्लाणी यांच्या घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवलेले आठ तोळ्यांचे दागिने आगीमध्ये वितळले आहेत. आग पसरल्यामुळे तिजोरी बाहेर काढणे शक्य झाले नाही. तसेच आगीमुळे तिजोरीही पेटली होती. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर तिजोरी खाली आणून ति कटरच्या सहाय्याने उचकटून काढण्यात आली. यावेळी तिजोरीतील कपडे जळाले होते तर दागिने वितळले होते.
- स्थानिकांचे बचावकार्यात मदत
घिसाड गल्ली कोल्हापूरातील संवेदनशील एरिया आहे. मात्र गुरुवारी रात्री लागलेल्या आगीमध्ये येथील तरुणांनी एकीचे दर्शन घडविले. आपआपसातील हेवेदावे बाजूला ठेवत 5 कुटूंबांना मदतीचा हात दिला. जिवावर उदार होवून एका घरातील दोन लहान मुलांना बाहेर काढले. तर गणेश काळे हे वरच्या मजल्यावर गाढ झोपेत होते. त्यांनाही बाहेर काढण्यात पुढाकार घेतला. काही तरुणांनी आग लागल्याचे समजताच घरातील गॅस व इतर ज्वलनशील वस्तू बाहेर काढल्या. अग्नीशमन दलाची वाहने पोहोचेपर्यंत या तरुणांनी मोलाची मदत केली.








