ऑस्ट्रेलिया पराभूत, युवराजचे 7 षटकार
वृत्तसंस्था / रायपूर
2025 च्या इंटरनॅशनल मास्टर्स लीग वयस्करांच्या क्रिकेट स्पर्धेत युवराज सिंग आणि शहबाज नदीम यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर इंडिया मास्टर्स संघाने बलाढ्या ऑस्ट्रेलिया मास्टर्स संघाचा 94 धावांनी दणदणीत पराभव करत अंतिम फेरी गाठली. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली इंडिया मास्टर्स संघाचा अंतिम सामना रविवारी खेळविला जाणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंडिया यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी रायपूरचे स्टेडियम शौकिनांनी भरगच्च झाले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंडिया मास्टर्सला प्रथम फलंदाजी दिली. सचिनने 42 धावांची खेळी केल्यानंतर अष्टपैलु युवराज सिंगने आक्रमक फटकेबाजी करत 7 षटकार ठोकले. इंडिया मास्टर्सने 20 षटकात 7 बाद 220 धावा जमविल्या. अंबाती रायडू 5 तर पवन नेगी 11 धावांवर बाद झाले. त्यानंतर एका बाजुने सचिनने चिवट फलंदाजी केली. सचिनला दोन जीवदाने मिळाली. सचिनने तिसऱ्या गड्यासाठी 47 धावांची भागिदारी केली. त्याने 30 चेंडूत 7 चौकारांसह 42 धावा जमविल्या. युवराज सिंगने 30 चेंडूत 7 षटकार आणि 1 चौकारांसह 58 धावा झोडपल्या. स्टुअर्ट बिन्नीने 21 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 36, युसुफ पठाणने 10 चेंडूत 2 षटकार 2 चौकारांसह 23, इरफान पठाणने 7 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 19 धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे ख्रिस्टेन आणि डुहेर्टी यांनी प्रत्येकी 2 तर ओकेली आणि कोल्टरनाईल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडिया मास्टर्सच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा डाव 18.1 षटकात 126 धावांत आटोपला. कर्णधार वॅटसन केवळ 5 धावांवर बाद झाला. शॉन मार्शने 15 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21, डंकने 17 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 21, रियरडोनने 14 चेंडूत 3 चौकारांसह 21 तर बेन कटिंगने 30 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 39 धावा आणि डुहेर्टीने 1 षटकारासह 10 धावा केल्या. इंडिया मास्टर्स संघातर्फे नदीमने 15 धावांत 4 तर विनयकुमार आणि इरफान पठाण यांनी प्रत्येकी 2 तर बिन्नीने 1 गडी बाद केला. युवराज सिंगने मॅकगेनच्या एका षटकात 3 षटकार ठोकत 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक: इंडिया मास्टर्स 20 षटकात 7 बाद 220 (सचिन तेंडुलकर 42, युवराज सिंग 59, स्टुअर्ट बिन्नी 36, नेगी 14, युसुफ पठाण 23, इरफान पठाण 19, अवांतर 20, डुहेर्टी, ख्रिस्टेन प्रत्येकी 2 बळी), ऑस्ट्रेलिया मास्टर्स 18.3 षटकात सर्वबाद 126 (कटिंग 39, शॉन मार्श 21, डंक 21, रिअरडॉन 21, नदीम 4-15, इरफान पठाण 2-31, विनयकुमार 2-10)









