वृत्तसंस्था / .ओटावा
कॅनडामध्ये लिबरल पक्षाचे नेते मार्क कर्नी यांनी त्या देशाच्या नेतेपदाचे शपथग्रहण केले आहे. शुक्रवारी या देशाची राजधानी ओटावा येथे त्यांचा शपथविधी झाला. जस्टीन ट्रूडो यांनी पदत्याग केल्यानंतर काही काळाने कर्नी यांची नेतेपदी निवड झाली होती. भारताशी मैत्रीचे संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाखतीत स्पष्ट केले होते.
जानेवारीत ट्रूडो यांनी पदत्याग केल्यानंतर कर्नी यांची नियुक्ती राष्ट्रीय सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात आली होती. कर्नी यांना लिबरल पक्षाच्या 85 प्रतिशत सदस्यांची संमती असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले होते. याच वर्षी कॅनडामध्ये संसदेची सार्वत्रिक निवडणूक होणार असून या निवडणुकीत पक्षाला यशस्वी करण्याचे आव्हान मार्क कर्नी यांच्यासमोर आहे. मार्क कर्नी हे यशस्वी बँक संचालक म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे कर्नी यांनी एकदाही कॅनडाच्या संसदेचे सदस्यत्व मिळविलेले नाही. तसेच ते तेथील वरीष्ठ सभागृहाचेही सदस्य कधी राहिलेले नाहीत. ते लवकरच कॅनडात सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रूडो यांच्या पदत्यागानंतर कॅनडात लिबरल पक्षाची लोकप्रियता वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच या पक्षाच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या कॉन्झरर्व्हेटिव्ह पक्षाच्या लोकप्रियतेत काहीशी घट झाल्याचेही पहावयास मिळत आहे. सध्या अमेरिका आणि कॅनडा यांच्यात व्यापार युद्ध भडकण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. ट्रंप यांनी कॅनडाच्या सार्वभौमत्वाचा आदर केल्यास त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.









