होळीच्या दिवशी हवामान आल्हाददायक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजधानी दिल्लीत होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच शुक्रवारी अनेक भागात हलका पाऊस झाला. राजधानीतील रहिवाशांना सकाळी सूर्यप्रकाशाचा सामना करावा लागत होता, परंतु काही वेळाने काळे ढग दाटून येऊ लागले. त्यानंतर अनेक भागात हलका पाऊसही पडल्यामुळे होळीच्या दिवशी आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. दिल्लीप्रमाणेच नोएडामध्येही रिमझिम पाऊस पडला.
भारतीय हवामान खात्याने यापूर्वी होळीच्या दिवशी दिल्लीत हलक्या पावसाची शक्यता वर्तवली होती. या इशाऱ्याप्रमाणेच होळीच्या दिवशी दिल्लीतील लोकांनी दिवसाची सुरुवात स्वच्छ आणि आल्हाददायक हवामानाने केली. शहरातील किमान तापमान 17.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सामान्यपेक्षा 2.5 अंशांनी जास्त होते. .हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 16 मार्चपर्यंत दिल्ली आणि एनसीआर भागात हवामान जवळजवळ सारखेच राहण्याची शक्यता आहे. आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून काही भागात मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 16 मार्चनंतर हवामान स्वच्छ होण्यास सुरुवात होईल. यानंतर, उष्णता वाढण्याची शक्यता आहे.









