बांगलादेशच्या राजदूताची खळबळजनक पोस्ट : स्वत:च्या सरकारवरच गंभीर आरोप
वृत्तसंस्था/ ढाका
मोरक्कोमधील बांगलादेशचे राजदूत हारुन अल रशीद यांनी बांगलादेशातील स्थिती बिकट होत चालली असल्याचे म्हटले आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यावर देशात अराजकता फैलावणे, धर्मनिरपेक्ष चौकट मोडीत काढणे, कट्टरवाद्यांचे समर्थन करणे आणि शेख हसीना यांचे सरकार पाडविण्याचा आरोप त्यांनी केला आहे. बांगलादेशात मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे. देश प्रतिदिन गर्तेत जात असताना जग सर्वकाही पाहूनही गप्पच आहे. पाश्चिमात्य देशानी युनूस यांच्या विरोधात कारवाई करण्याची गरज असल्याचे रशीद यांनी म्हटले आहे.
बांगलादेश पूर्णपणे दहशतवाद आणि अराजकतेच्या तावडीत सापडला आहे. युनूस यांच्या शासनाकडुन प्रसारमाध्यमांची गळचेपी केली जात असून अत्याचाराच्या घटनांना वाचा फुटत नाही. यामुळे कट्टरवाद्यांना मुक्त हस्त मिळाला आहे. युनूस यांच्या देखरेखीत कट्टरवादी बांगलादेशची धर्मनिरपेक्ष आणि सांस्कृतिक ओळख नष्ट करत आहेत. हे लोक केवळ संग्रहालये, मूर्ती आणि सांस्कृतिक प्रतिकांना नष्ट करत नसून शेकडो सूफी दर्गा, हिंदू मंदिरांनाही उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप रशीद यांनी केला.
महिलांवर सर्वाधिक अत्याचार
युनूस यांच्या शासनात महिलांवर सर्वाधिक अत्याचार होत आहेत. अल्पसंख्याक आणि धर्मनिरपेक्ष लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. हिज्ब-उत-तहरीर, इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा यासारख्या संघटना उघडपणे इस्लामिक शासनाची मागणी करत आहेत. वंगबंधू मुजीबुर्रहमान यांच्य जीवनावर बंगाली कादंबरी लिहिल्याने युनूस सरकार माझ्यावर भडकले आहे. बांगलादेश एक धर्मनिरपेक्ष देश होता, परंतु कट्टरवादी आता ही ओळख नष्ट करू पाहत आहेत. देशाचे संस्थापक शेख मुजीबुर्रहमान आणि त्यांच्या कन्या शेख हसीना दोघेही कट्टरवाद्यांचे शिकार ठरले असल्याचे रशीद यांनी म्हटले आहे.
युनूस यांचा खरा चेहरा सर्वांसमोर
सत्ता मिळाल्यावर युनूस यांनी स्वत:चा मुखवटा उतरविला आहे. ते एक सुधारक नसून अत्याचारी शासक असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शेख हसीना यांनी ज्या बांगलादेशला घडविले, त्याच्याच विरोधात युनूस यांनी युद्ध छेडले आहे. इतिहास युनूस यांना एक नायक म्हणून नव्हे तर ठक म्हणून आठवणीत ठेववणार असल्याचे रशीद यांनी म्हटले आहे.









