दापोली :
तालुक्यातील आंजर्ले खाडीकिनारी वसलेल्या अडखळ येथे दोन गटात बुधवारी सायंकाळी जोरदार हाणामारी झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. जमावाला पांगवण्यासाठी रत्नागिरीहून जादाचे पोलीस कुमक मागवण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून दोन्ही गटांना शांत करण्याचे काम सुरू होते.
अडखळ येथे एका गटातील काही युवक बसले होते. त्यांना पाजपंढरी येथील काही लोकांनी हटकले असता दोन गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर पाजपंढरी गावातील अनेकांनी अडखळमध्ये प्रवेश केला आणि हाताला जे मिळेल त्याचा मारा अडखळ येथील युवकांच्या दिशेने सुरू केला. यामध्ये लोखंडी शिगा, लाकडे, दगडांचा मोठ्या प्रमाणात भरणा होता. यामुळे अनेक घरांच्या काचा फुटल्या. तसेच वाहनांचे नुकसान झाले. यात काही गंभीर जखमी झाल्याचेही वृत्त आहे. अडथळ येथे दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती मिळताच दापोली पोलीस त्याठिकाणी तत्काळ रवाना झाले. शांतता अबाधित राखण्याकरिता अधिकचा फौजफाटा रत्नागिरी येथून मागवण्यात आला होता.








