कोल्हापूर / धीरज बरगे :
शेतकरी सहकारी संघ सध्या अत्यावस्थ स्थितीत आहे. उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असणारा खत कारखाना बंद आहे. त्याचबरोबर कर्जाचा बोजा वाढतच आहे. कारभारी संचालकांकडून सुरु असलेल्या स्वहित व अनागोंदी कारभारामुळे संघाच्या आर्थिक अडचणीत वाढच होत आहे. ठराविक जणांकडून सुरु असलेल्या मनमानी कारभारास आता अन्य संचालकच वैतागले आहे. आठ ते दहा संचालकांनी संघाच्या कारभारातून लक्ष काढले असून संचालक मंडळाच्या बैठकीकडेही त्यांनी पाठ फिरवली आहे. अनागोंदी कारभाराबाबत नेत्यांकडे तक्रार करुनही त्यांच्याकडून होणाऱ्या दूर्लक्षामुळे संचालकांमध्येही प्रचंड नाराजी आहे.
शेतकरी सहकारी संघ म्हणजे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राचे एकेकाळी वैभव होते. मात्र आपला संघ मानून काम करणारे संचालक मंडळ येथे कार्यरत होते तो पर्यंत संघाचा प्रवास डौलात सुरु होता. मात्र जेंव्हापासून स्वहित बघितले जावू लागते तेंव्हापासून संघाच्या भक्कम आर्थिक स्थितीस उतरती कळा लागली, ती आजही कायम आहे. संघास गतवैभव मिळवून देण्यासाठी सव्वा वर्षापुर्वी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत पॅनेल तयार केले. सभासदांनी सर्वपक्षीय नेत्यांवर विश्वास दाखवत त्यांचे पॅनेल विजयी केले. मात्र सर्वपक्षीयांची मोट संघाला पुर्वीप्रमाणे उभारी देईल या सभासदांच्या विश्वासास सर्वपक्षीय नेत्यांचे शिलेदार खरे उतरले नाहीत. त्यांच्याकडून सध्या सूरु असलेला कारभार पाहता ते संघाला कर्जाच्या खाईत ढकलून संघ पूर्णपणे बंद पाडणार अशी भीती अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
- कर्जाचा आकडा सात ते आठ कोटींवर
शेतकरी संघावरील कर्जाचा आकडा वाढतच आहे. संघाच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या खत कारखाना नियमित सुरु राहण्यासाठी यापुर्वीच जिल्हा बँकेकडून पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. मध्यतंरी संघाचे पेट्रोल पंप ड्राय पडू लागले. त्यामुळे संबंधित पेट्रोल कंपनीकडुन संघास नोटीस बजावली होती. पेट्रोल पंप नियमित सुरु राहण्यासाठी पुन्हा जिल्हा बँकेने दीड कोटी रुपयांचे कर्ज दिले. यानंतर पुन्हा खत कारखान्यासाठी भांडवल नसल्याने कारखाना बंद होता. परिणामी पुन्हा जिल्हा बँकेने दोन कोटी रुपयांची कर्ज दिले आहे. मात्र खत तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवठा करणाऱ्या पुरवठा दाराकडे तीन लाख रुपये कमिशन मागितले जात असल्याने त्याने कच्च्या मालाचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून खत कारखाना बंद आहे.
- खताचे अपेक्षित उत्पादन नाही
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी संघ प्रतिवर्षी चार ते पाच हजार टन खत तयार करुन ठेवतो. शेतकऱ्यांमधून शेतकरी संघाच्या खतास मोठी मागणी आहे. त्यामुळे खत उत्पदनासाठी जिल्हा बँकेने संघास अर्थसहाय्य केले. मात्र स्वहितासाठी या अर्थसहाय्याच योग्य असा वापर होताना दिसत नाही. सध्या केवळ आठशे टनच खत उत्पादन झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अर्थसहाय्य पुरवून देखिल खताचे अपेक्षित उत्पादन झाले नसल्याने कर्जाच्या खाईत संघ लोटला जात असल्याची चर्चा आहे.
- कारभाऱ्यांच्या कारभाराला संचालकच वैतागले
शेतकरी संघात सध्या मंत्री हसन मुश्रीफ गटाचे चेअरमन आहेत. चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होवून दोन महिने उलटले. मात्र ते राजीनामा देण्यास तयार नाहीत. नेत्यांकडे तक्रार करुनही दूर्लक्ष होत आहे. त्यात दोन चार कारभारी संचालक व काही माजी संचालकांकडून संघात मनमानी कारभार सुरु आहे. मध्यंतरी परस्पर केलेल्या ऑईल विक्रीतून संघाचा 20 ते 25 लाखांचा तोटा झाला. या ऑईल विक्रीला अन्य संचालकांनी मंजुरी दिलेली नाही. याबाबत जिल्हा उपनिबंधक यांनी खुलासा देखिल मागितला आहे. त्यामुळे संघातील मनमानी कारभाराला संचालकच वैतागले आहेत.
- टिंबर मार्केटमधील जागा लिलावात काढण्याची चर्चा
शेतकरी संघाच्या टिंबर मार्केटमधील जागेवर अनेकांचा डोळा आहे. त्यामुळे शेतकरी संघावर कर्जाचा डोंगर वाढवायचा आणि हे कर्ज फेडण्यासाठी संघाच्या टिंबर मार्केटमधील जागेचा लिलाव करायचा असा डाव असल्याची चर्चा संघामध्ये सुरु आहे.
- कार्यकारी संचालकांकडून आरेरावी
संघान नव्याने नियुक्त केलेल्या कार्यकारी संचालकांकडूनही कर्मचाऱ्यांना अरेरावी, एकेरी भाषा वापरली जात आहे. त्यामुळे कार्यकारी संचालकांकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबत अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीतही संचालकांनी कार्यकारी संचालकांच्या अरेरावीला आवर घलण्याची मागणी केली होती.
- सर्व संचालक एकत्रच, चुकीची चर्चा
शेतकरी सहकारी संघाच्याबाबतीत सुरु असलेली चर्चा चुकीची आहे. काहीजणांकडून संघातील कारभाराबाबत गैरसमज पसरविण्याचे काम सुरु आहे. संघातील सर्व संचालक एकत्रित रित्या योग्य पद्धतीने काम करत आहेत. नेते सांगतिल तेंव्हा चेअरमन पदाचा राजीनामा देणार आहे.
– प्रवीणसिंह पाटील, चेअरमन शेतकरी संघ.








