कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शिवाजी विद्यापीठाचे वार्षिक अंदाजपत्रक म्हंटले की शैक्षणिक व संशोधनावर भरीव तरतूद करणारे अंदाजपत्रक मानले जाते. गेल्या दोन वर्षाच्या अंदाजपत्रकात काळानुरूप बदल करून संशोधनासह प्रशासकीय कामात नवीन इमारतींनाही भरभरून निधी दिला आहे. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या ऑडीटवर ऑडीटरने ताशेरे ओढले होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात झालेल्या अधिसभेत सदस्यांनी भरपूर्ण गोंधळ घातला होता. हे ऑडीट दुरूस्त करून देण्याचे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाने दिल्याप्रमाणे ऑडीट रिपोर्ट उत्तम केल्याची चर्चा आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या कार्यकालावधीतील हे अखेरचा अंदाजपत्रक असल्याने तो बिनचूक आणि संशोधनाला चालना देणारा केल्याचे बोलले जात आहे. हे अंदाजपत्रक शनिवार 15 मार्च रोजी विद्यापीठात होणाऱ्या अधिसभेत सादर केले जाणार आहे.
शिवाजी विद्यापीठाची अधिसभा म्हंटले की अधिसभा सदस्यांचा गोंधळ हमखास ठरलेला आहे. परंतू प्रशाकीय कामाचा 35 वर्षाचा अनुभव गाठीशी असल्याने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी अधिसभा सदस्यांना समर्पक उत्तरे देवून उत्तम प्रशासक असल्याचे सिध्द केले आहे. म्हणूनच सभात्यागसारख्या घटना फारशा घडलेल्या नाहीत. संशोधन, दर्जेदार शिक्षण, क्रीडा यासह प्रशासकीय कामावरदेखाल कुलगुरेची कमांड आहे. त्यामुळेच त्यांनी परीक्षेचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन मोडवर आणून एक प्रकारे क्रांतीच केली आहे, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. स्वत:ची एसआरपीडी तयार केली असून प्रश्नपत्रिका पाठवल्यापासून ते उत्तरपत्रिकांची ऑनस्क्रिन तपासणीपर्यंतची सर्व कामे ऑनलाईन पध्दतीने केली जात आहेत. तसेच बरेच दिवस रखडलेला भुयारी मार्गाला जवळपास शासनाकडून 7 कोटी निधी आणून एक वर्षात हा मार्ग पूर्ण केला. त्यामुळे दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
- पीएम उषा अंतर्गत 20 कोटीचा निधी
पीएम उषा योजनेअंतर्गत संशोधनासाठी 20 कोटीचा निधी शिवाजी विद्यापीठाला मिळाला आहे. या योजनेअंतर्गत संशोधनासाठी लागणारी उपकरणे, प्रशिक्षण वर्ग आणि स्टार्टअपसाठीही मदत केली जाते. तसेच संशोधक विद्यार्थीनींना कोठे राहायचे असा प्रश्न होता. त्यासाठी विद्यापीठाच्या निधीतून संशोधक द्यार्थीनींसाठी वसतिगृह बांधून त्यांच्या राहण्याचा प्रश्न मार्गी लावला. हा प्रकल्प संशोधनाला चालना देणाराच म्हणावा लागेल.
- खेळाडूंना प्रोत्साहन
खेळाडूंना वेळप्रसंगी विमानाने जाण्याची परवानगी देवून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर खेळाडूंच्या दैनंदिन भत्त्यात दोनवेळा वाढ करीत पौष्टिक आहार देण्याचे काम केले. खेळाडूंनीसुध्दा अनेक पदके मिळवून विद्यापीठाच् दिली आहेत. यामध्ये 18 खेळाडूंनी ऑल इंडिया विविध खेळांमधील स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. अॅथलेटिक्समध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळवली. खेलो इंडियामध्ये बाराव्या क्रमांकाचे स्थान मिळवले. फ्रान्स येथे झालेल्या स्पर्धेत बारा खेळाडूंपैकी 6 खेळाडू शिवाजी विद्यापीठाचे होते. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, अर्जुन पुरस्कार मिळवून विद्यापीठाची मान उंचावली आहे. त्यामुळेच खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कुलगुरूंनी मॅटवरील कुस्ती संकुल, खेळाडू वस्तीगृहाची निर्मिती करून खेळाडूंना प्रोत्साहन दिली आहे.
- यंदाच्या अंदाजपत्रकात केलेली तरतूद
कुस्ती संकुल, वसतिगृह : 3 कोटी 50 लाख
शैक्षणिक व संशोधनासाठी : 1.50 कोटी
कमवा व शिका दैनंदिन खर्च : 4 कोटी
मेरीट स्कॉलरशिप : 6 कोटी
दिव्यांगांच्या सुविध : 2 कोटी
विद्यार्थी कल्याण व युवा वसतिगृह इमारतीसाठी : 2 कोटी
सर्वांगीण विद्यार्थी विकास आणि संगणक सुविधा केंद्र : 5 कोटी








