कराड :
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, कराडचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची 113 वी जयंती बुधवारी 12 मार्चला असून यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांनी स्वर्गीय चव्हाण यांना अभिवादन करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मदत, पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे समाधीस्थळी शासनाच्या वतीने अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
जयंतीनिमित्त आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी सकाळी शहर व परिसरातील शालेय विद्यार्थी स्वर्गीय चव्हाण यांना शब्दसूरांची आदरांजली अर्पण करणार आहेत. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती कराडच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये सकाळी 9 वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जयंती साजरी केली जाणार आहे. यावेळी यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार असून या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्समध्ये सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्सचे ‘यशवंत’ व वेणूताई चव्हाण कॉलेजचे ‘संगम’ या दोन्ही नियतकालिकांचे प्रकाशन माजी प्राचार्य विश्वासराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी अल्ताफहुसेन मुल्ला असणार आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार यांनी दिली.








