लेफ्टनंटर जनरल फैजुर रहमान नजरकैदसदृश स्थितीत
वृत्तसंस्था/ ढाका
शेजारी देश बांगलादेशात उलथापालथ सुरूच आहे. बांगलादेशच्या सैन्यात नेतृत्वबदल घडवून आणण्याचा कट रचला होता. सैन्याचे लेफ्टनंट जनरल फैजुर रहमान हे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर बंडाची तयारी करत होते असे समोर आले आहे. पाकिस्तानधार्जिणे अन् जमात समर्थक लेफ्टनंट जनरल फैजुर रहमान बांगलादेशच्या सैन्याचे प्रमुख वकार उज्जमान यांच्या विरोधात बंड करणार होते. यासंबंधी त्यांनी चालू महिन्यात एक बैठक बोलाविली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी सैन्यप्रमुखांच्या कार्यालयाला याबद्दल कळविल्याने कट उधळला गेला.
जानेवारी महिन्यात फैजुर रहमान यांनी जमात नेते अन् पाकिस्तानी मुत्सद्यांची भेट घेतली होती. बांगलादेशच्या सैन्यप्रमुखांना या बैठकांबद्दल माहिती देण्यात आली होती. यानंतर बांगलादेशच्या सैन्यप्रमुखांनी लेफ्टनंट जनरल रहमान यांना सैन्य गुप्तचर यंत्रणा डीजीएफआयच्या देखरेखीत ठेवले आहे.
बांगलादेशात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी सैन्यप्रमुख्घंनी सर्व नेत्यांना इशारा दिला होता. परस्परांमध्ये भांडू नका, अन्यथा देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो. मी तुम्हाला इशारा देतोय, अन्यथा नंतर मी इशारा दिला नव्हता असे म्हणू नका असे सैन्यप्रमुख वकार उज्जमान यांनी म्हटले होते.
सैन्याकडे राहणार नियंत्रण
देशाची कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचे कार राजकीय साठमारी देखील आहे. सर्व नेते परस्परांवर आरोप करण्यात व्यग्र असलयाने समाजकंटक वातावरण बिघडवत आहेत. या अराजक स्थितीत ते सहजपणे वाचत आहेत. केवळ नेत्यांना मी इशारा देतोय, यामागे माझा कुठलाही वैयक्तिक अजेंडा किंवा महत्त्वाकांक्षा नाही. तर देशहितासाठी मी हे करतोय. देशात शांतता प्रस्थापित व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. जोपर्यंत देशात निवडून आलेले सरकार येत नाही तोवर सैन्यच बांगलादेशची कायदा-सुव्यवस्था पाहणार आहे असे सैन्यप्रमुख उज्जमान यांनी म्हटले होते.









