वृत्तसंस्था / इंडियन वेल्स
एटीपी आणि डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात ऑस्ट्रेलियाचा किरगॉईस, रशियाचा व्हेरेव तसेच रुड यांचे आव्हान संपुष्टात आले. महिलांच्या विभागात ट्यूनेशियाच्या जेबॉरला पराभव पत्करावा लागला.
पुरुष एकेरीच्या सामन्यात हॉलंडच्या ग्रिकस्पूरने रशियाच्या टॉपसिडेड अॅलेक्स झांडेर व्हेरेवचे आव्हान 4-6, 7-6 (7-5), 7-6 (7-4) असे संपुष्टात आणत दुसरी फेरी गाठली. ग्रिकस्पूरचा तिसऱ्या फेरीतील सामना फ्रान्सच्या मिपेशी बरोबर होणार आहे. अमेरिकेच्या गिरॉनने नॉर्वेच्या कास्पर रुडचा 7-6 (7-4), 3-6, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीने लिहेकाचा 3-6, 6-4, 7-5, ग्रिसच्या सित्सिपसने होल्गेर रुनेचा 6-2, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीतील झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या किरगॉईसला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. किरगॉइस आणि झेंडस्कल्प यांच्यातील या सामन्यात किरगॉइसने पहिला सेट 7-6 (7-5) असा जिंकून दुसऱ्या सेटमध्ये 3-0 अशी आघाडी मिळविली असताना किरगॉइसला अचानकपणे मनगटामध्ये वेदना सुरू झाल्या. काही दिवसांपूर्वी दुखावलेल्या मनगटावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
महिलांच्या विभागात पोलंडच्या टॉपसिडेड इगा स्वायटेकने फ्रान्सच्या कॅरोलिनी गार्सियाचा 6-2, 6-0, युक्रेनच्या डायेना यस्ट्रीमेस्काने ट्युनेशियाच्या जेबॉरचा 6-3, 6-2, इलिना रायबाकिनाने हॉलंडच्या सुझान लॅमेन्सचा 6-3, 6-3, ब्रिटनच्या बोल्टरने रुमानियाच्या बेगुचा 6-7 (2-7), 6-3, 6-0, असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.









