जिल्हाधिकाऱ्यांची सूचना : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग, ऑटोरिक्षांचे दर ठरवा, बंदावस्थेतील सीसीटीव्ही सुरू करा
बेळगाव : रिक्षाचालकांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी ऑटोरिक्षा प्रवासाचे दर ठरविण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गुरुवारी केली आहे. जिल्हा रस्ते सुरक्षितता समितीच्या अध्यक्षपदावरून बोलताना बेळगावसह जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण घटविण्यासाठी सुरक्षितता उपाययोजना राबविण्याचेही त्यांनी सांगितले आहे. तीन महिन्यांपूर्वी ऑटोरिक्षांना मीटर सक्तीचे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न चालविले होते. आरटीओ व वाहतूक पोलिसांना यासंबंधीची सूचना देण्यात आली होती. आता मीटरसक्ती बाजूला पडली असून रिक्षा प्रवासाचे दर ठरवावे, किमान दर, रात्रीच्या वेळचे दर व थांबण्यासाठीचे दर निश्चित करावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून मनमानी भाडे वसुली थांबविण्यासाठी रिक्षाचे दर ठरवावे. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन, सीबीटी व शहरातील प्रमुख चौकातील ऑटोरिक्षाचालकांना यासंबंधी सूचना द्यावी. सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय व लूट होऊ नये यासाठी आवश्यक काळजी घेण्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
अवैज्ञानिक गतिरोधक हटवावेत
जिल्ह्यात अवैज्ञानिक पद्धतीने बसविण्यात आलेले गतिरोधक हटवावेत, शहापूर, उद्यमबाग, टिळकवाडी परिसरातील प्रमुख रस्त्यांवर सात सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. ते त्वरित सुरू करावेत, अशी सूचना स्मार्ट सिटी विभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, प्रादेशिक आयुक्तांचे कार्यालय, जिल्हा पंचायत कार्यालय परिसरात बेकायदा पार्किंग केले जात आहे, ते हटवावे. चन्नम्मा सर्कलपासून जिल्हा ग्रंथालय, जिल्हा पंचायत कार्यालय परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. या परिसरात एकेरी वाहतूक सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत असावेत. आणखी ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी कॅमेरे बसवावेत. प्रमुख वळणावर माहिती व सूचना फलक बसवावेत. वारंवार ज्या रस्त्यांवर अपघात घडत आहेत, त्या परिसरातही इशारा देणारे फलक उभारावेत. ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी सावकाश वाहने चालविण्यासंबंधी सूचना देणारे फलक बसवावेत. अपघातप्रवण विभागात सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात. रस्ते सुरक्षिततेच्या नियमाविषयी नागरिकांमध्ये जागृती करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
यावेळी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती, गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते एस. एस. सोबरद यांच्यासह वाहतूक, पोलीस व इतर विभागाचे जिल्हा पातळीवरील अधिकारी उपस्थित होते.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या घटना वाढत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी या बैठकीत केली आहे. तर जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी बेकायदा पार्किंग हटविण्याबरोबरच जिल्ह्यातील प्रमुख चौक, उड्डाणपुलांवर होणारी वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली आहे.









