येत्या काही दिवसात आदेश निघण्याची शक्यता
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेचे दरवाजे लवकरच बंद करण्यात येतील, अशी शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या काही दिवसांमध्ये असा आदेश काढण्याची शक्यता आहे. 2016 ते 2020 या आपल्या प्रथम कार्यकाळातही ट्रम्प यांनी सात मुस्लीमबहुल देशांच्या नागरिकांना अमेरिका बंदी घोषित केली होती. असाच आदेश ते त्यांच्या या द्वितीय काळातही काढतील अशी शक्यता आहे. हा आदेश पुढच्या आठवड्यात येऊ शकतो. अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहासमोर भाषण करताना ट्रम्प यांनी पाकिस्तानने इस्लामी दशहतवादी पकडून देण्यास साहाय्य केल्याचा उल्लेख केला होता. तसेच त्यासाठी त्यांनी पाकिस्तानी प्रशासनाचे आभारही मानले होते. तथापि, त्यानंतर त्वरित ते पाकिस्तानी नागरिकांना अमेरिका प्रवेश बंद करण्याची शक्यता आहे.
20 जानेवारीला आदेश
अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर 20 जानेवारीला ट्रम्प यांनी जे प्रथम आदेश काढले त्यात अमेरिका प्रवेशबंदीचा आदेशही समाविष्ट होता. मात्र, तो 12 मार्चनंतर लागू करण्यात येणार होता. या काळात अमेरिकेच्या सुरक्षेला धोका उत्पन्न करतील असे देश कोणते आहेत, याचा अहवाल सादर करण्याचा ट्रम्प यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना दिला आहे. या देशांमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचाही समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे, असे अमेरिकन प्रशासनाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. यासंबंधी 12 मार्चच्या आत अहवाल सादर केले जातील आणि त्यानंतर ट्रम्प प्रवेशबंदीचा अंतिम आदेश काढतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बंदीच्या सूचीत पाकिस्तानचा समावेश असल्यास, आधीच आर्थिक अडचणींनी ग्रासलेल्या पाकिस्तानला तो मोठा धक्का असेल. सध्या हजारो अफगाणी नागरिक अमेरिकेत आश्रय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनाही या आदेशाचा धक्का बसण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानात फोफावतोय दहशतवाद
अलिकडच्या काळात पाकिस्तानात इस्लामी दहशतवाद अधिकच फोफावताना दिसत आहे. नुकताच या दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला करुन 9 जणांची हत्या केली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सध्या संघर्ष खदखदत असून त्यासाठीही पाकिस्ताने पोसलेल्या दहशतवादी संघटनाच जबाबदार आहेत, असे अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे.









