शेतकऱ्यांची धनगरांना समज, समन्वयातून निघाला तोडगा
बेळगाव : बेळगाव परिसरातील शेतीतील रब्बी पिके संपल्यानंतरच धनगरांनी आपली बकरी शेतामध्ये सोडावीत. त्यापूर्वी जर बकरी शेतांमध्ये सोडली तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी बुधवारी आयोजित बैठकीत दिला. धनगरांनीही शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अनगोळ, जुने बेळगाव, वडगाव, शहापूर शिवारात रब्बी पिके असताना बकरी घालणार नाही असे आश्वासन दिले. रब्बी पिके झाल्यानंतर बकरी चारविण्यासाठी मुभा देखील देण्यात आली. शेतकरी व धनगरांची संयुक्त बैठक बुधवारी वडगावच्या ज्ञानेश्वर मंदिरात पार पडली. काही दिवसांपूर्वी धनगरांकडून शेतांमध्ये बकरी घालण्याचे प्रकार घडले. त्यामुळे मसूर, जोंधळा, काकडी, गहू, मोहरी, टरबूज या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी जाब विचारणा केल्यावर त्यांच्यावरच धावून जाण्याचा प्रयत्न झाला. यामुळे शेतकऱ्यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
धनगरांना घडलेल्या प्रकाराबाबत समज
बुधवारी प्रथमत: धनगरांना घडलेल्या प्रकाराबाबत समज देण्यात आली असे प्रकार पुन्हा घडल्यास कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. रब्बी हंगामात शेतीचे नुकसान करणार नाही, असे लेखी पत्र घेण्यात आले. एप्रिल व मे अशा दोन महिन्यात रब्बी पिके नसताना बकरी चारविण्याची मुभा धनगरांना देण्यात आली. यावेळी अमोल देसाई, मनोहर हलगेकर, किर्तीकुमार कुलकर्णी, महादेव पाटील, रमाकांत बाळेकुंद्री, पिंटू कंग्राळकर, गंगाधर मयेकर, बाबू सुळगेकर, यल्लाप्पा सैबण्णवर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.









