वार्ताहर/तवंदी
निपाणीनजीक तवंदी घाटात शिप्पूर तिट्टा येथील हॉटेल कावेरीनजीक कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या स्पिरीट वाहू टँकरला अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. निपाणी अग्निशमन दलाला टँकर चालक येरूमल्लय्या (वय 55 रा. तामिळनाडू) याला वाचविण्यात यश आले. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. स्पिरीट टँकर हा कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने जात होता. दरम्यान तवंदी घाटात आल्यानंतर अचानक टँकरला आग लागली. घटनास्थळी कोणीही जाण्यास तयार नव्हते.
याची माहिती निपाणी अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानुसार निपाणी अग्निशमन दलाचे ठाणाधिकारी वाय. बी. कौजलगी, जगदीश कांबळे निंगाप्पा कमते, एस. आय. खिचडी, डी. एल. कोरे, उमेश मठपती यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच टँकरचालक येरूमल्लय्या याला टँकरमधून निपाणी अग्निशामक दलाच्या सर्व जवानांनी बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे कर्मचारी आणि संकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वाहनांच्या रांगा
टँकरचा स्फोट होऊ नये यासाठी दोन्ही बाजूला महामार्गावर वाहने थांबवण्यात आली. तसेच शिप्पूर येथून आजरा-सावंतवाडी मार्गावरील वाहतूक काहीकाळ थांबविण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.









