संतप्त युवकांकडून मुतगे ग्रा. पं. अध्यक्ष-पीडीओ धारेवर : समस्यांकडे वेधले लक्ष
वार्ताहर/सांबरा
मुतगे येथे चार वर्षे होऊन गेली तरी अद्याप ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त बनलेल्या गावातील युवकांनी मंगळवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीमध्ये पंचायत विकास अधिकारी व आजी-माजी ग्रा. पं. अध्यक्षांना चांगलेच धारेवर धरले. मंगळवार दि. 4 रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मासिक बैठक होती. याची कुणकुण गावातील युवकांना लागल्यानंतर युवकांनी बैठकीमध्ये जाऊन पंचायत विकास अधिकारी व आजी-माजी ग्रा. पं. अध्यक्षांना याबाबत जाब विचारला व चांगलेच धारेवर धरले. सध्याची ग्रामपंचायत अस्तित्वात येऊन चार वर्षे उलटून गेली असून येत्या डिसेंबरला पाच वर्षे पूर्ण होणार आहेत. मात्र या पाच वर्षांमध्ये एकही ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. पीडीओ दरवेळेला थातूरमातूर कारणे सांगून वेळ मारून नेत आहेत व आजी माजी ग्रा. पं. अध्यक्षही ग्रामसभा घेण्याबाबत उदासीन दिसत आहेत. त्यामुळे युवकांनी पंचायत विकास अधिकारी व आजी-माजी अध्यक्षांना चांगलेच धारेवर धरले व ग्रामसभा न घेण्यामागचे कारण स्पष्ट करण्याचे सांगितले.
20 मार्चला कोणत्याही परिस्थितीत ग्रामसभा घेण्याचा निर्णय
यावेळी युवकांचा ऊद्रावतार पाहून ग्रामपंचायतीमार्फत येत्या 20 मार्चला कोणत्याही परिस्थितीत ग्रामसभा घेण्यात येईल, असे त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले. तसेच गावातील रस्ते, गटारी व पाणी समस्येकडेही युवकांनी लक्ष वेधले. त्यानंतर सर्व युवक माघारी परतले. शरद पाटील, राजेंद्र पाटील, गजानन बिरादार, सागर पाटील, प्रशांत कुरळे, सयाजी पाटीलसह गावातील शंभरहून अधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आता ग्रामस्थांचे 20 तारखेकडे लक्ष
युवकांचा संताप पाहून ग्राम पंचायतीने 20 मार्च रोजी ग्रामसभा घेण्याचे लेखी लिहून दिले खरे. मात्र 20 मार्चला तरी ग्रामसभा घेतात की पुन्हा पळवाट काढून ग्रामसभा रद्द करतात, अशी चर्चा सध्या गावात सुरू असून ग्रामस्थांचे आता 20 तारखेकडे लक्ष लागून राहिले आहे.









