पर्यावरणासाठी मोठा धोका
पाकिस्तानात लांडग्यांची प्रजाती विलुप्त होण्याच्या वाटेवर आहे. मागील काही दशकांमध्ये तेथील लांडग्यांच्या संख्येत आश्चर्यकारक स्वरुपात घट झाली आहे. जर लांडग्यांना वाचविण्यासाठी त्वरित उपाय करण्यात न आयलास पाकिस्तानात लांडगे पूर्णपणे विलुप्त होऊ शकतात असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
पाकिस्तानात आढळून येणाऱ्या भारतीय अन् तिबेटी लांडग्यांचे प्रमाण इतके कमी झाले आहे की पूर्ण पाकिस्तानात शेकडोच लांडगे उरले आहेत. पाकिस्तानात लांडग्यांच्या संख्येत घट होण्याचे सर्वात मोठे कारण माणूसच आहे. वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी रब नवाज यांच्यानुसार माणसांनी लांडग्यांच्या अधिवासालाच नष्ट केले आहे. लांडग्यांची हत्या होत असून त्यांची शिकार होत आहे. यामुळे लांडग्यांच्या संख्येत मोठी घट होत आहे. पाकिस्तानात वन्यजीवांची विविधता आहे, परंतु लांडग्यांसह याच्या अनेक प्रजाती धोक्यात आहेत आणि स्थानिक स्तरावर ते विलुप्त होण्याचा धोका असल्याचे नवाज यांनी म्हटले आहे.
अलिकडच्या वर्षांमध्ये मानवी दबावामुळे पाकिस्तानात लांडग्यांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. विशेषकरून भारतीय लांडग्यांना पाकिस्तानात विलुप्तप्राप्त प्रजाती मानले जाते. त्यांची संख्या आणि तपशीलावरून माहिती कमी असल्याने त्यांच्या संरक्षणाचे प्रयत्न अवघड ठरत आहेत असे ते म्हणाले भारतीय लांडगे विकासाच्या दृष्टीकोनातून सर्वात विशेष लांडग्यांच्या प्रजातींपैकी एक असून ते केवळ भारत आणि पाकिस्तानातच आढळून येतात असे जेनेटिक्स स्टडीजमध्ये दिसून आले आहे. भारतीय लांडग्यांची संख्या तिबेटी लांडग्यांच्या तुलनेत अधिक वेगाने कमी होत असल्याने त्यांच्या अस्तित्वावर गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे वन्यजीव तज्ञ सईदुल इस्लाम यांनी सांगितले.
पाकिस्तानात तिबेटी लांडग्यांना चिनी लांडगे, मंगोलियन लांडगे, कोरियन लांडगे, स्टेपीज किंवा वूली वोल्व्स देखील म्हटले जाते आणि त्यांची संख्या भारतीय लांडग्यांच्या तुलनेत अत्यंत स्थिर आहे. त्यांचे अधिवास अद्याप माणसांपासून वाचलेले असल्याने हे घडत आहे. तिबेटी लांडगे करड्या रंगाचे असतात, जे चीन, रशिया, मंचूरिया, तिबेट, भारत, नेपाळ आणि भूतानच्या हिमालयीन क्षेत्रांमध्ये आढळून येतात. या प्रजातीला त्यांच्या कमी संख्येमुळे यापूर्वीच ‘संकटग्रस्त’ ठरविण्यात आले आहे आणि निसर्ग संरक्षणासाठी जागतिक संस्था आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघाच्या रेड लिस्टमध्ये याला सामील करण्यात आले आहे.
संरक्षणाची तत्काळ गरज
भारतीय लांडग्यांच्या संख्येतील घटीमागचे मुख्य कारण त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला नुकसान, वाढती लोकसंख्या आणि शेतकऱ्यांकडून होत असलेली हत्या आहे. भारतीय लांडगे पाकिस्तानच्या दक्षिण सिंध प्रांत, बलुचिस्तान आणि उत्तर-पूर्व पंजाब प्रांतात आढळून येतात. भारतीय लांडग्यांच्या उलट तिबेटी लांडगे गिलगिट-बाल्टिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि पीओकेतील पर्वतीय भागांमध्ये आढळून येतात. त्यांचे अधिवास तुलनेत स्थिर आहेत. तसेच त्यांच्याकरता शिकार उपलब्ध असून माणसांची संपर्क खूपच कमी आहे. तरीही तिबेटी लांडग्यांची संख्या देखील घटत आहे.
पर्यावरण संतुलनात मोठी भूमिका
निसर्गाचे संतुलन राखण्यात लांडग्यांची मोठी भूमिका असते. लांडगे उत्तम शिकारी असतात, जे शाकाहारी प्राण्यांच्या संख्येला नियंत्रित करत निसर्गाचे चक्र संतुलित राखण्यास मदत करतात. तर शिकारीनंतर लांडगे जे खाद्य टाकून देतात, ते खाऊन अनेक छोटे प्राणी स्वत:चे पोट भरत असतात. लांडग्यांवर पाकिस्तानात फारच कमी अध्ययन करण्यात आले आहे. संशोधन अन् संरक्षण कार्यक्रमांमध्ये त्यांना बऱ्याचअंशी दुर्लक्षित करण्यात आले आहे. परंतु ते पर्यावरणासाठी अत्यंत आवश्यक आहेत असे हरिपूर विद्यापीठातील वन्यजीव विषयक विभागाचे प्रमुख मोहम्मद कबीर यांनी म्हटले आहे.









