दापोली :
दापोली नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यावर अखेर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. शिंदे शिवसेनेच्या गटनेत्या शिवानी खानविलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा ठराव दाखल केला. दोन तृतीयांश संख्याबळ शिंदे गटाकडे असल्याने हा ठराव सहज पारित होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी शिंदे शिवसेनेकडून कृपा घाग यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे.
नगर पंचायतीमध्ये गेल्या महिन्याभरात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली आहे. यामध्ये ठाकरे शिवसेना गटाच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांच्याव्यतिरिक्त सर्व नगरसेवकांनी हातातील मशाल खाली ठेवून शिंदे शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. यामुळे दापोली नगर पंचायतीमधील ठाकरे शिवसेना गटाचे 14 हे मताधिक्य घटून ते 1 वर आले आहे. सध्या शिवसेना शिंदे गटाकडे 14 नगरसेवकांचे मताधिक्य, शिवाय महायुतीतील घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी व भाजपकडे मिळून प्रत्येकी 1 असे 16 नगरसेवकांचे मताधिक्य आहे. नगराध्यक्ष ममता मोरे या एकट्याच ठाकरे गटामध्ये आहेत. यामुळे हा अविश्वास ठराव विरोधक लिलया संमत करतील, अशी अटकळ बांधली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केल्यावर जिल्हाधिकारी या ठरावाची छाननी करून सभेचे आयोजन करतात. सभेत हा ठराव ठेवला जातो व ठरावाच्या बाजूने व ठरावाच्या विरोधात मतदान घेतले जाते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना एक महिन्याचा कालावधी असतो. जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी हा ठराव दाखल करण्यात आला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील निर्णयाकडे सर्व दापोलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
- महिला नगराध्यक्षामुळे 14 जणांचे संख्याबळ हवे
दापोली नगर पंचायतीमध्ये 17 नगरसेवक आहेत. नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल पारित करण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच 13 नगरसेवकांचे मताधिक्य आवश्यक असते. महिला नगराध्यक्ष असेल तर 14 नगरसेवकांचे मताधिक्य आवश्यक ठरते. ही संख्या सध्या शिंदे शिवसेना गटाकडे आहे. नगराध्यक्ष ममता मोरे या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आल्या होत्या. त्यांच्याच विरोधात ज्यांच्याकडे सध्या धनुष्यबाण हे चिन्ह आहे, त्या शिवसेना शिंदे गटाने अविश्वास ठराव दाखल केला आहे.
- कृपा घाग होणार नव्या नगराध्यक्षा
शिवसेना शिंदे गटाच्यावतीने दापोलीच्या नगराध्यक्षा मोरे यांच्यावर दाखल केलेल्या अविश्वास ठरावाबाबत महिनाभराच्या आत जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कृपा घाग या नगराध्यक्ष होतील, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळाली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नगर पंचायत निवडणुकीत अपक्ष नगरसेवकांचे पॅनल उभे केले होते. यामध्ये कृपा घाग या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. ज्येष्ठत्वानुसार त्यांना नगराध्यक्ष होण्याची संधी देण्यात येईल, असे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले.








