खेड :
कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांतून महिलांचे दागिने लंपास करण्याचे सत्र सुरुच आहे. 2 मार्च रोजी मडगाव–नागपूर स्पेशलमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे 1 लाख 33 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र तर त्याचदिवशी तुतारी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे 2 लाख 61 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरट्याने लांबवले.
रुपाली पांडुरंग चाचे (30 रा. कामोठे–नवी मुंबई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या 2 मार्च रोजी नागपूर–मडगाव स्पेशलमधून बी 5 मधील 63 क्रमांकाच्या आसनावर प्रवास करत होत्या. एक्स्प्रेस कळंबणी बुद्रुक थांब्याजवळ आली असता एका अनोळखी इसमाने त्यांच्या पाठीमागून येत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत पोबारा केला. हे मंगळसूत्र 25 ग्रॅमचे व 1 लाख 33 हजार रुपये किंमतीचे हेते. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या चोरीच्या घटनेमध्ये शालिनी भिकाजी नेरकर (60, नेरुळ–नवी मुंबई) तुतारी एक्स्प्रेसमधून प्रवास करत होत्या. त्या झोपलेल्या असताना चोरट्याने त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली दागिने असलेली पर्स लंपास केली. या पर्समध्ये 2 लाख 61 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल असा ऐवज होता. झोपून उठल्यानंतर पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
- चोरीच्या वाढत्या घटनांनी प्रवासी चिंतेत
कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्यासह पर्समधील दागिने लंपास करणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. विशेषत: दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक व खेड रेल्वे स्थानकादरम्यान चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. चोऱ्यांच्या वाढत्या घटनांनी प्रवाशी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.








