10 मार्चपासून अंमलबजावणी; नैर्त्रुत्य रेल्वेकडून लावण्यात आले फलक : नागरिकांची होणार गैरसोय
बेळगाव : तानाजी गल्ली रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय नैर्त्रुत्य रेल्वेने घेतला आहे. सोमवार दि. 10 मार्चपासून रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद केले जाणार आहे. नैर्त्रुत्य रेल्वेकडून तानाजी गल्ली, फुलबाग गल्ली परिसरात बोर्ड लावण्यात आले असून वाहतुकीसाठी रेल्वेगेट बंद राहणार असल्याने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे सूचविण्यात आले आहे. तानाजी गल्ली रेल्वेगेट येथे उड्डाणपूल करण्याबाबत नैर्त्रुत्य रेल्वेचा प्रस्ताव होता. परंतु रेल्वेगेट झाल्यास आसपासच्या इमारती व दुकानदारांचे नुकसान होणार असल्याने त्याला विरोध झाला.
8 ऑक्टोबर 2024 रोजी खासदार जगदीश शेट्टर यांनी नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. त्यावेळीही नागरिकांनी विरोध केल्याने उड्डाणपूल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद राहील, असा इशारा रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला होता. सोमवारी रात्री नैर्त्रुत्य रेल्वेकडून रेल्वेगेट परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत. 10 मार्चपासून तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद राहणार असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे. रेल्वेगेट बंद होणार असल्याची माहिती नागरिकांना समजावी यासाठी हे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
विद्यार्थी-नागरिकांचे होणार हाल
तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद झाल्यास परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. या परिसरात सरकारी प्राथमिक शाळा असून शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जुना धारवाड रोड येथील ओव्हरब्रिजवरून उलटा प्रवास करत जावे लागणार आहे. त्याचबरोबर भरतेश शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे कपिलेश्वर व धारवाड रोड उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही उड्डाणपुलांच्या सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करून त्यानंतर रेल्वेगेट बंद करावे, अशी मागणी रहिवाशांतून होत आहे.









