मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : परिसरात भीतीचे वातावरण
बेळगाव : बंद घराचा कुलूप तोडून अवघ्या तासाभरात सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशा एकूण 3 लाख रुपयांच्या ऐवजावर चोरट्याने डल्ला मारला आहे. सोमवार दि. 4 रोजी सायंकाळी समर्थनगर, मल्लिकार्जुननगर येथे ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी ज्योती विजय लोहार, मूळ रा. घर नं. 355/2 महाद्वार रोड चौथा क्रॉस, सध्या राहणार समर्थनगर, मल्लिकार्जुननगर यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास चालविला आहे.
याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी की, ज्योती या गेल्या काही वर्षांपासून समर्थनगर, मल्लिकार्जुननगर येथे भाड्याच्या घरात राहतात. सोमवारी सायंकाळी 5 च्या दरम्यान त्या घराला कुलूप घालून कपिलेश्वर मंदिराला गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत चोरट्याने घराचा कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाट फोडून 1 लाख 62 हजार 500 रुपये किमतीचे 25 ग्रॅमचे मंगळसूत्र, 65 हजार रुपये किमतीची 10 ग्रॅमची सोनसाखळी, 10 ग्रॅमची अंदाजे 65 हजार किमतीची अंगठी, अशा एकूण 2 लाख 97 हजार 500 रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारून चोरट्याने पलायन केले.
सायंकाळी 6 च्या दरम्यान ज्योती मंदिराहून परतल्यानंतर घडला प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. अवघ्या तासभरात चोरट्यांनी आपला डाव साधल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीच्या घटनेची माहिती मार्केट पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ञ, तसेच श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. ज्योती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे.









