बेळगाव : जुनेबेळगाव येथे आयोजित श्री नरवीर तानाजी तालिम स्पोर्ट्स चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात श्री राम सेना हिंदुस्थान अनगोळ संघाने श्री गणेश स्पोर्ट्स वडगावचा पराभव करुनश्री नरवीर तानाजी तालिम चषक पटकाविला. मनीष घाडगे याला मालिकावीराने गौरविण्यात आले. जुनेबेळगाव येथील घेण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एसआरएस हिंदुस्थानने गांधीनगर संघाचा 10 धावांनी तर श्री गणेश-वडगावने अनगोळ संघाचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात एसआरएस हिंदुस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अंतिम सामना हा 6 षटकांचा होता. प्रथम फलंदाजी करत असताना श्री गणेश स्पोर्ट्स वडगाव या संघाने 5.5 षटकामध्ये 8 गडी बाद 33 धावा जमविल्या. त्यात मनीष घाडगेने 3 चौकारांसह 22 धावा केल्या. तर प्रशांत उचगावकरने 3 गडी बाद करुन संघाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसआरएस हिंदुस्थान या संघाने 4 षटकात 2 गडी बाद 34 धावा जमवत सहा गड्यांनी विजय मिळविला.
अंतिम सामन्याचा सामनावीर एसआरएस हिंदुस्थान संघाचा प्रशांत उचगावकर, राकेश असलकर मालिकेतील उत्कृष्ट फलंदाज, एसआरएस हिंदुस्थान या संघाचा उमेश कुऱ्याळकर, मालिकेतील उत्कृष्ट गोलंदाज एसआरएस हिंदुस्थान या संघाचा प्रशांत उचगावकर, मालिकावीर श्री गणेश स्पोर्ट्स वडगाव या संघाचा मनीष घाडगे याने मिळविला. या सामन्यावेळी अमर बाळकुंद्री, मदन पाटील, जितेंद्र चौगुले, मनोहर होसुरकर, गजानन रेडेकर, संतोष शिवणगेकर, पृथ्वी सुतार, सतीश खनूकर, प्रशांत सुतार, योगेश धामणेकर, सौरभ टपाले, सुनील टपाले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.









