श्वानांचे निर्बिजीकरण रखडले : संख्येत झपाट्याने वाढ
बेळगाव : बेळगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दोन दिवसातून एकदा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे जखमी झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होत आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी म्हणजे मागील दोन महिन्यात बेळगाव जिल्ह्यात रेबिजमुळे दोघा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात एकूण 8 जणांचा रेबिजमुळे मृत्यू झाला आहे. यापैकी 4 बेंगळूर व उर्वरित इतर जिल्ह्यांमधील आहेत. कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील वर्षभरात राज्यात 66,489 श्वानदंशांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक विजापूर जिल्ह्यात म्हणजेच 4,552 श्वानदंशांचा समावेश आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2024 या संपूर्ण वर्षात रेबिजमुळे 42 जणांचा मृत्यू झाला होता. तर 3 लाख 61 हजार 522 श्वानदंशांचा समावेश आहे. पशु संगोपन खात्यातर्फे निर्बिजीकरण तसेच जागृती केली जात आहे. परंतु, यावर मर्यादा येत असल्याने निर्बिजीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. श्वानदंशामुळे रेबिज होण्याचे प्रमाणही वाढले असून कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी शहरात मनपाने मोहीम उघडली होती. परंतु, सध्या ही मोहीम थंडावली आहे. शहरातील हॉटेलमधील टाकाऊ पदार्थ, शिळे अन्न खाऊन भटकी कुत्री ठाण मांडून आहेत. त्यांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने निर्बिजीकरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.









