आमचे पाणी आमचा हक्क आंदोलनाचे सुजीत मुळगुंद यांची माहिती
बेळगाव : हिडकल जलाशयातून हुबळी-धारवाडला पाणी देण्यासाठी घालण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांचे काम थांबविण्यात यावे, अन्यथा 5 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा ‘आमचे पाणी, आमचा हक्क’ आंदोलनाअंतर्गत देण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील विविध तहसीलदारांनी आपापल्या व्याप्तीमध्ये सुरु असलेली जलवाहिनी घालण्याचे काम बंद केले असून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे. त्यामुळे नियोजित मार्चा रद्द करण्यात आल्याचे आमचे पाणी आमचा हक्क आंदोलनाचे संयोजक, सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सोमवार दि. 3 रोजी शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘आमचे पाणी आमचा हक्क’ आंदोलनाच्यावतीने ही माहिती देण्यात आली. बेळगाव शहरासह जिल्ह्यातील इतर गावांना हिडकल जलाशयातून पाणी पुरवठा केले जाते. त्यातच हुबळी-धारवाड औद्योगिक वसाहतीला हिडकल जलाशयातून पाणी नेण्यासाठी पाईप लाईन घालण्याचे काम सुरू आहे. मात्र या प्रकल्पाला तीव्र विरोध असून सदर प्रकल्प रद्द व्हावा, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मागणीची पूर्तता न झाल्यास येत्या 5 मार्च रोजी धर्मवीर संभाजी महाराज चौकांतून मोर्चाने येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता.
आश्वासनाची पूर्तता केल्याने अभिनंदन
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मागणीची दखल घेऊन लवकरच योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. हुबळी, धारवाड औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करण्याच्या कामाला हुक्केरी तहसीलदारांनी काम बंद पाडले आहे. तसेच सौंदत्ती, बैलहोंगल रामदुर्ग व इतर तालुक्यातील कामही संबंधित तहसीलदारांनी थांबविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नियोजित मोर्चा मागे घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शशिकांत नाईक, शेतकरी संघटनेचे नेते मोदगी उपस्थित होते.









