खासगी भाजी मार्केटविरोधात शेतकरी संघटनेचे निवेदन
बेळगाव : बेळगाव शहरात एपीएमसी भाजी मार्केट असतानाही खासगी भाजी मार्केटला परवानगी देण्यात आली. सध्या त्या मार्केटमध्ये कमिशनच्या नावाखाली अनेक गैरप्रकार सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या मर्जीनेच हे सर्व प्रकार सुरू असून एपीएमसी परिसरात पुन्हा भाजी मार्केट सुरू करावे, या मागणीसाठी सोमवारी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना (हरित सेना) च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
खासगी भाजी मार्केटमधील गैरव्यवहार बंद करण्याची मागणी
एपीएमसी मार्केट हे 80 एकर जागेत वसले असून 300 दुकान गाळे आहेत. यापैकी अनेक दुकानगाळे सध्या रिक्त आहेत. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही प्रशासनाने खासगी जय किसान भाजी मार्केटला प् ारवानगी दिली. काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक गैरव्यवहार सुरू असून राजकीय वरदहस्ताने हे गैरव्यवहार चालविले जात आहेत. त्यामुळे खासगी भाजी मार्केटऐवजी एपीएमसी येथेच भाजी मार्केट सुरू करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी आल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिका घेतल्याने बराच काळ शेतकरी कार्यालयासमोर बसून होते. यावेळी शेतकरी नेते प्रकाश नाईक यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.









