प्रस्तावित द्विपक्षीय व्यापारावर होणार सविस्तर चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यापारविषयक चर्चेसाठी अमेरिकेला प्रयाण केले आहे. सध्या दोन्ही देशांचे धोरणकर्ते द्विपक्षीय व्यापार समाझोत्यासाठी सज्जता करीत आहेत. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि अमेरिकेचे व्यापार मंत्री हॉवर्ड लुटनिक यांच्याशी गोयल यांच्या वाटाघाटी होणार आहेत.
2030 पर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्पर व्यापार 500 अब्ज डॉलर्सपर्यंत (साधारणत: 44 लाख कोटी रुपये) वाढविण्याची इच्छा दोन्ही देशांनी बोलून दाखविली आहे. गेल्या महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप याची व्हाईट हाऊसमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली होती. या चर्चेतही द्विपक्षीय व्यापारात मोठी वाढ करण्याच्या दृष्टीने एका रुपरेखेवर विचार झाला होता. आता या दिशेने दोन्ही देशांनी वेगवान पावले टाकण्याचा निर्णय घेतला असून गोयल यांची अमेरिकाभेट याच दृष्टीने महत्वाची आहे.
काही महिन्यांमध्ये मोठा करार
येत्या सहा ते आठ महिन्यांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापक आणि सर्वसमावेषक व्यापार समझोता होण्याची शक्यता आहे. भारतातून अमेरिकेत येणाऱ्या मालावर उच्च कर लावला जाईल, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी ट्रंप यांनी केली होती. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या मालावर लावल्या जाणाऱ्या कराचे प्रमाण कसे आणि काय असावे, यावर गोयल यांच्या या दौऱ्यात बोलणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा दौरा अत्यंत महत्वाचा असल्याचे तज्ञांचे मत आहे.
एकमेकांना प्रस्ताव देणार
गोयल यांच्या या दौऱ्यात दोन्ही देश एकमेकांना करासंबंधीचे प्रस्ताव देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत, असे दोन्ही देशांना वाटते. त्यामुळे करांचे प्रमाण दोन्ही देशांनी कमी ठेवल्यास व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. अमेरिकेशी मुक्त व्यापार करार करता येईल काय, याचीही या दौऱ्यात चाचपणी होणे शक्य आहे. तसे झाल्यास दोन्ही देश एकमेकांच्या मालांवर कमीत कमी कर लावू शकतात. 2016 ते 2020 या अध्यक्ष ट्रंप यांच्या प्रथम कार्यकालात दोन्ही देश एक छोटेखानी व्यापार करार करण्यासाठी सज्ज होत होते. तथापि, 2020 मध्ये अमेरिकेत सत्तांतर झाल्याने हा करार होऊ शकला नाही. कारण जोसेफ बायडेन यांना अशा प्रकारे करार करायचा नव्हता. पण आता पुन्हा ट्रंप अध्यक्षस्थानी आल्याने एक व्यापक करार करण्याच्या दृष्टीने वातावरण अनुकूल असल्याची भावना आहे.
सध्या व्यापार किती…
2023 च्या आर्थिक वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापाराचे प्रमाण 190.08 डॉलर्स इतके होते. त्यांच्यापैकी वस्तू व्यापार 123.89 अब्ज डॉलर्स तर सेवा व्यापार 66.19 अब्ज डॉलर्स इतका होता. या आर्थिक वर्षात भारताने अमेरिकेला केलेल्या वस्तू आणि सेवा निर्यातीचे प्रमाण 83.77 अब्ज डॉलर्स इतके, तर अमेरिकेकडून आयात केलेल्या वस्तू आणि सेवांचे प्रमाण 40.12 अब्ज डॉलर्स इतके होते. यापुढच्या सहा वर्षांमध्ये हा द्विपक्षीय व्यापार 2023 च्या प्रमाणाच्या जवळपास अडीच पट वाढविण्याची दोन्ही देशांची महत्वाकांक्षा आहे.
चर्चेकडे तज्ञांचे लक्ष
पियुष गोयल हे अमेरिकेच्या व्यापार मंत्र्यांशी जी चर्चा करणार आहेत, त्या चर्चेकडे अनेक तज्ञांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण, भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार संबंधात ही चर्चा पायाची भूमिका निभावणार आहे. या चर्चेमुळे दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधांना एक निश्चित आणि दीर्घकाळ टिकू शकेल, असा आकार मिळणार असून त्यामुळे भविष्यकाळात संबंध आणखी दृढ होण्याच्या दिशेने प्रगती होण्याची शक्यता आहे. ही चर्चा मंगळवारी होणार, अशी माहिती आहे.









