वृत्तसंस्था/ हायफा
इस्रायलच्या हायफा शहरात सोमवारी गोळीबार अन् चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या असून यात अनेक जण जखमी झाले आहेत. तर एका 70 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
शहराच्या बसस्थानकावर हल्ला झाला आहे. हल्लेखोराची ओळख पटली नसली तरीही त्याला कंठस्नान घालण्यात आल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले. चाकू हल्ल्यात 4 जण जखमी झाले आहेत. तर गोळी लागलाने एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी तपास केला जात असल्याचे आपत्कालीन सेवा डेव्हिड एडोमचे प्रमुख एली बिन यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी अलिकडेच मुक्तता झालेला ओलीस एली शाराबी याच्या विलंबाने झालेल्या मुक्ततेप्रकरणी माफी मागितली. मुक्ततेसाठी इतका वेळ लागला याबद्दल आम्हाला खेद आहे. आम्ही तुमच्या मुक्ततेसाठी मोठा संघर्ष केला असल्याचे नेतान्याहू यांच्या कार्यालयाने शाराबी यांना उद्देशून म्हटले आहे.
शाराबी यांची हमासने 16 महिन्यांनी मुक्तता केली होती. शाराबी यांची पत्नी अन् दोन मुलींची हमासने हत्या केली होती. शाराबी हे मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहेत.









