हिमानी ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपीचा दावा
वृत्तसंस्था/ रोहतक
हरियाणाच्या रोहतक येथे बसस्थानकावर सापडलेल्या सुटकेसमधील मृतदेहाचे रहस्य आता उघड झाले आहे. या सुटकेसमध्ये 22 वर्षीय हिमानी नरवाल या काँग्रेस नेत्याचा मृतदेह सापडला होता. तिच्या हत्येप्रकरणी हरियाणा पोलिसांनी सचिन नावाच्या इसमाला अटक केली आहे. बहादुरगढ येथील सचिन हा हिमानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. हिमानी मला ब्लॅकमेल करत होती, तसेच माझ्याकडून तिने लाखो रुपये घेतले होते असा दावा आरोपीने केला. तर हिमानीच्या परिवाराने ही हत्या अन्य कुणी केली असावी असा संशय व्यक्त केला आहे. हिमानीची हत्या काँग्रेसमधील अंतर्गत चढाओढीमुळे झाल्याचे हिमानीच्या आईने म्हटले आहे.
ज्या सुटकेसमध्ये हिमानीचा मृतदेह मिळाला, ती हिमानीची होती. म्हणजेच हिमानीची हत्या घरात करण्यात आली होती. माझी मुलगी वादग्रस्त इसमाला स्वत:च्या आयुष्यात स्थान देणार नाही असे तिच्या आईने म्हटले आहे. तर पोलिसांना आरोपी सचिनकडे हिमानीचा मोबाइल सापडला आहे. हिमानी अन् सचिनची मैत्री फेसबुकमुळे झाली होती.
हिमानीने सचिनविषयी कुणालाच सांगितले नव्हते. आपण अरेंज मॅरेज करू इच्छिते असे ती सांगायची. आमची मुलगी कुणाला ब्लॅकमेल करणारी नव्हती. घरी हत्या केल्यावर एकटा इसम सुटकेसमधून मृतदेह नेऊ शकत नाही. या हत्येप्रकरणी अनेकांचा हात असू शकतो असा दावा हिमानीच्या कुटुंबीयांनी केला आहे. हिमानीच्या मृतदेहावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तत्पूर्वी कुटुंबीयांनी तिचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दर्शविला होता. एका आरोपीला अटक केल्यावर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास होकार दर्शविला.
हिमानी नरवाल ही काँग्रेसमध्ये अत्यंत सक्रीय होती. हरियाणातील काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांसोबत ती कार्यक्रमांमध्ये भाग घेत होती. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ती सहभागी झाली होती. हिमानीची हत्या काँग्रेसच्या नेत्यांकडून करविण्यात आल्याचा दावा तिच्या आई अन् भावाने केला आहे. तर पोलिसांनी हिमानीच्या हत्येमागे ब्लॅकमेलिंगचा अँगल असल्याचे तूर्तास म्हटले आहे.









