आरोग्य स्थायी समिती बैठकीत दौऱ्याबाबत चर्चा : अधिकाऱ्यांवर सोपविली नियोजनाची जबाबदारी
बेळगाव : चंदीगड दौऱ्यानंतर आता नगरसेवकांना इंदोर दौऱ्याचे भाग्य लाभणार आहे. नुकत्याच महापालिकेत पार पडलेल्या आरोग्य स्थायी समिती बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली असून आरोग्य स्थायी समितीच्या सदस्यांसह एका अधिकाऱ्याला या दौऱ्यात सहभागी होता येणार आहे. त्यामुळे इंदोर अभ्यास दौऱ्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्याची सूचना यापूर्वीच बैठकीत करण्यात आल्याने दौऱ्याची निश्चिती आणि नियोजन करण्याची जबाबदारी आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आल्यानंतर विविध नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. अलीकडेच चंदीगड दौऱ्यावर गेलेल्या बेळगाव महानगरपालिकच्या नगरसेवकांनी त्याठिकाणी महापालिका व स्मार्ट सिटीने उभारलेल्या प्रकल्पांची पाहणी करून माहिती घेतली. या दौऱ्याची फलश्रुती म्हणून तुरमुरी येथील घनकचरा प्रकल्पात पिंक पोल्ट्री सुरू करण्यात आली आहे.
अनेक नवीन उपक्रम राबविण्याचा मानस
त्याचबरोबर अनेक नवीन उपक्रमदेखील राबविण्याचा मानस महापालिकेच्यावतीने ठेवण्यात आला आहे. नुकत्याच आरोग्य स्थायी समिती बैठकीत इंदोर दौऱ्याबाबत चर्चा करण्यात आली. यापूर्वी हुबळी-धारवाड महानगरपालिकेचे आरोग्य स्थायी समितीचे सदस्य आणि अधिकारी चंदीगडला अभ्यास दौऱ्यावर गेले होते. त्याचप्रमाणे बेळगाव महापालिकेच्या आरोग्य स्थायी समिती सदस्य आणि त्यांच्यासोबत एका अधिकाऱ्याला इंदोर अभ्यास दौऱ्याला जाता येऊ शकते असे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे अध्यक्ष शैलेश कांबळे यांनी तातडीने या अभ्यास दौऱ्याची अर्थसंकल्पात तरतूद करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती.
अभ्यास दौऱ्यासाठी 10 ते 12 लाख खर्च
सदर अभ्यास दौऱ्यासाठी 10 ते 12 लाख रुपये खर्च करता येऊ शकतात, अशी देखील तरतूद आहे. त्यामुळे या दौऱ्याचे नियोजन करण्याची जबाबदारी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. चंदीगड दौऱ्यानंतर महापालिकेच्यावतीने बेळगावातही काही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे चंदीगडनंतर इंदोरमध्येही नवनवीन उपक्रम राबविण्यात आले असल्याने त्याची माहिती घेण्यासाठी बेळगाव महापालिकेचे नगरसेवक जाणार आहेत.









