वृत्तसंस्था/ प्राग
प्राग मास्टर्सच्या चौथ्या फेरीच्या अखेरीस ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने आपल्याच देशाचा अरविंद चिदंबरमसोबत तीन गुणांसह अव्वल स्थानावर जाण्यात यश मिळविले आहे. त्याने आपला सलग दुसरा विजय नोंदविताना जर्मनीच्या विन्सेंट कीमरला पराभूत केले. दुसरीकडे, सुऊवातीच्या काही अडचणींनंतर अरविंदने अमेरिकेच्या सॅम शँकलँडशी बरोबरीवर समाधान मानले, तर चीनच्या अव्वल मानांकित वेई यीने अखेर स्थानिक स्टार डेव्हिड नवाराला हरवून आपला फॉर्म मिळवला. नेदरलँड्सच्या अनीश गिरीने तुर्कीच्या गुरेल एडिझसोबत चौथी बरोबरी नोंदविली, तर झेक ग्रँडमास्टर न्गुयेन थाई दाई व्हॅननेही व्हिएतनामच्या क्वांग लेम लेसोबतचा सामना बरोबरीत सोडवि ला.
प्रज्ञानंद आणि अरविंद आघाडीवर असून शँकलँड, कीमर, गिरी आणि ले तिसऱ्या स्थानावर आहेत आणि पाच फेऱ्या बाकी असल्याने विजेतेपदाची शर्यत फक्त दोन भारतीयांमध्येच रंगेल, असे दिसते. जवळजवळ एका महिन्यापूर्वी कीमरने टाटा स्टील मास्टर्समध्ये प्रज्ञानंदचा पराभव केला होता आणि भारतीय खेळाडूने त्या पराभवाचा बदला घेतला. 44 चालींमध्ये हा सामना संपला.
पुढील फेरीत अरविंद व प्रज्ञानंद एकमेकांविऊद्ध उभे ठाकणार असून त्यात प्रज्ञानंद पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळणार आहे. चॅलेंजर्स विभागात दिव्या देशमुखने चीनच्या मा कूनसोबत बरोबरी साधली. चार सामन्यांतून तिचे गुण 1.5 झाले आहेत. या विभागात संयुक्तपणे उझबेकिस्तानचा नोदिरबेक याकुबबोएव्ह आणि डेन्मार्कचा जोनास बुहल बजेरे हे आघडीवर असून त्यांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत.









