काँग्रेस नेते राहुल गांधींचा केरळ काँग्रेसच्या नेत्यांना सल्ला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अलिकडच्या टिप्पणीनंतर निर्माण झालेल्या वादादरम्यान राहुल गांधी यांनी केरळमधील पक्षाच्या नेत्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केरळ काँग्रेसचे नेते हे पुढील उद्देशावरून एकजूट आहेत असा दावा राहुल यांनी केला. काँग्रेसच्या रणनीतिवर विचार विनिमय करण्यासाठी केरळमधील नेत्यांसोबत त्यांनी विचारविनिमय केला आहे. तसेच राहुल गांधी यांनी रविवारी फेसबुकवर पोस्ट करत पक्षाच्या राजकीय रणनीतिबद्दल जागरुक असायला हवे असे नमूद केले आहे. या बैठकीत शिस्त, एकता आणि राज्य संघटनेला मजबूत करण्यावर चर्चा झाली होती. नेत्यांनी राजकीय रणनीतिवरून अत्यंत सावध रहायला हवे. तसेच पक्षाच्या भूमिकेच्या उलट काहीच करू नये तसेच बोलू नये असा सल्ला राहुल गांधींनी दिला. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शिस्त, एकता आणि केरळमधील काँग्रेसला मजबूत करण्यासाठी रिक्त पदांवर त्वरित नेमणूक करण्यावर जोर दिला आहे.
या बैठकीत काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल, वायनाडच्या खासदार प्रियांका वड्रा, केरळ काँग्रेसचे प्रमुख के. सुधाकरन, केरळमधील विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन, तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर आणि केरळ काँग्रेसच्या प्रभारी दीपा दासमुन्शी समवेत अन्य नेते सामील झाले होते. काँग्रेस भावनात्मक आणि राजकीय स्वरुपात केरळच्या लोकांशी अत्यंत जोडलेला असल्याचे स्पष्ट संकेत आम्हाला आमच्या नेतृत्वाकडून मिळाले आहेत. राज्यातील लोक परिवर्तन इच्छितात. याचमुळे केरळच्या लोकांचा अपमान होईल अशी कुठलीही कृती आमच्या हातून घडू नये. जर कुणी वैयक्तिक स्वरुपात काही बोलत असेल तर आम्ही कठोर कारवाई करू. केरळच्या लोकांचा अपमान कण्याचा कुठलाही अधिकार आम्हाला नाही असे उद्गार दासमुन्शी यांनी काढले आहेत.









