‘डीटीटीडीसी’कडून निविदा जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील यमुना नदीपात्रात लवकरच क्रूझ सफरीचा आनंद घेता येणार आहे. दिल्लीतील भाजपचे सरकार येथे यमुना स्वच्छतेसोबतच पर्यटन वाढवण्याची योजना आखत आहे. याअंतर्गत सरकार यमुनेत क्रूझ सेवा सुरू करणार आहे. याबाबतचा अभ्यास केला जात असून सध्याच्या प्रस्तावानुसार वजिराबाद बॅरेज ते जगतपूर गावापर्यंत क्रूझ सेवा सुरू केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यमुनेत 7-8 किलोमीटरपर्यंत क्रूझ चालवले जाईल. नदी पर्यटनाला चालना देण्यासाठी डीटीटीडीसी म्हणजेच दिल्ली पर्यटन आणि वाहतूक विकास महामंडळाने ही निविदा जारी केली आहे. यासाठी दिल्ली जल बोर्ड आणि सिंचन आणि पूर विभागानेही एनओसी दिली आहे. दिल्लीमध्ये 365 दिवसांपैकी 270 दिवसांसाठी क्रूझ किंवा फेरी ऑपरेशन्सना परवानगी आहे. ही सेवा पावसाळा वगळता वर्षभर चालेल. या क्रूझमध्ये 20-30 लोक बसू शकतील. सरकारच्या या उपक्रमामुळे पर्यटकांना दिल्लीतील भेटीत आणखी एका ठिकाणी आनंद लुटता येईल.









