नऊ दिवसांनंतरही 8 कामगारांच्या शोधासाठी युद्धपातळीवर मोहीम
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणातील नागरकुर्नूल येथील बांधकामाधीन श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल (एसएलबीसी) बोगद्यात अडकलेल्या 8 कामगारांच्या बचावकार्याचा रविवारी नववा दिवस सुरू झाला. 22 फेब्रुवारी रोजी बोगद्याचा एक भाग कोसळल्यापासून बचावकार्य सुरू आहे. या मोहिमेला अद्याप यश आले नसून गेल्या 9 दिवसांपासून अडकलेल्या कामगारांशी संपर्क होऊ शकला नाही. बोगद्यात पाणी, चिखल आणि भरपूर ढिगारा असल्याने बचावकार्यात खूप अडचणी येत आहेत. लष्कर, एनडीआरडी, एसडीआरएफसह 11 यंत्रणा बचावकार्यात गुंतल्या आहेत. तेलंगणाच्या मुख्य सचिव शांती कुमारी यांच्यासह मंत्री उत्तम कुमार रे•ाr आणि मंत्री जुपल्ली कृष्णा राव यांनी शनिवारी बोगद्याला भेट दिली. यानंतर, सर्वांनी बचावकार्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली.
बोगदा मार्गातील छताचा सुमारे तीन मीटर भाग कोसळल्यामुळे 8 कामगार अडकले आहेत. बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून आत 14 किमी अंतरावर भूस्खलन झाल्यामुळे हा अपघात घडल्ाा. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंचन प्रकल्पावर काम करणाऱ्या कंपनीच्या बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आता लष्करासह अन्य यंत्रणांची मदत घेऊन मदत व बचावकार्य राबविले जात आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 43 जण सुरक्षित बाहेर आले आहेत. उर्वरित कामगार कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला अडकल्याची माहिती नागरकुर्नूलचे पोलीस अधीक्षक वैभव गायकवाड यांनी दिली.
घाबरलेल्या कामगारांचा ‘रामराम’
अपघातानंतर बोगद्यात काम करणारे काही कामगार भीतीमुळे आपले काम सोडून गेले आहेत. एसएलबीसी प्रकल्पावर 800 लोक काम करत आहेत. यापैकी 300 स्थानिक आहेत आणि उर्वरित झारखंड, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमधील आहेत. सुरुवातीला कामगारांमध्ये निश्चितच भीती आहे. तथापि, कंपनीने त्यांच्यासाठी निवासी छावण्या बांधल्या आहेत, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
दरम्यान, बोगदा दुर्घटनेच्या घटनेवरून राजकारणही सुरू आहे. भाजप आमदारांनी नुकतीच घटनास्थळी भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना ही दुर्घटना सध्याच्या आणि मागील सरकारांच्या चुकीच्या व्यवस्थापनाचा परिणाम आहे. ही दुर्घटना निष्काळजीपणामुळे घडली, असे आमदार महेश्वर रेड्डीr म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बोगद्याच्या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यात आली आहे. आत अडकलेले आठ लोक सुखरूप बाहेर येतील अशी आम्हाला आशा असल्याचे भाजप आमदार पायल शंकर म्हणाल्या.









