बसपच्या सर्व पदांवरून हटविले : मायावतींच्या भावाकडे जबाबदारी
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा राजकीय पक्ष बसपमध्ये मोठा फेरबदल झाला आहे. पक्षाला नवा राष्ट्रीय समन्वयक मिळाला आहे. आकाश आनंद यांच्या जागी त्यांचे पिता आणि पक्ष महासचिव आनंद कुमार आणि राज्यसभा खासदार राम गौतम यांना बसपचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून नेमण्यात आले आहे. माझ्या जिवंतपणी किंवा माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत पक्षात आता कुणीच माझा उत्तराधिकारी नसणार आहे असे वक्तव्य मायावती यांनी केले आहे. माझ्यासाठी पक्ष अन् चळवळच सर्वप्रथम आहे. भाऊ-बहिण आणि इतर नातेसंबंध त्या तुलनेत माझ्यासाठी दुय्यम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बसप अध्यक्ष मायावती यांनी रविवारी लखनौमध्ये पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावत हा निर्णय घेतला आहे. या बैठकीत अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष सामील झाले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत समीक्षा बैठक घेण्यात आली. आकाश आनंद यांना बसपच्या सर्व पदांवरून हटविण्यात आले आहे. या बैठकीत मायावती, राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद, पक्षाचे महासचिव सतीश चंद्र मिश्रा आणि राज्यसभा खासदार राम गौतम सामील झाले होते, परंतु आकाश आनंद यात सहभागी झाले नाहीत. मायावतींनी डिसेंबर 2023 मध्ये आकाश आनंद यांना स्वत:चा उत्तराधिकारी घोषित केले होते. आकाश आनंद यांच्यावर नंतर मायावती नाराज झाल्या होत्या.
आकाश आनंद यांनी सीतापूर येथे भाजप सरकारला दहशतीचे सरकार संबोधिले होते, ज्यानंतर त्यांच्यावर एफआयआरही नोंदविला गेला होता. तर याचबरोबर भाषणादरम्यान त्यांनी शिव्यांचा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यांच्यावर जोरदार टीकाही सुरू झाली होती. मायावती यांनी काही दिवसांपूर्वी आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांना पदावरून हटविले होते.









