पित्याची आत्महत्या : भावाचा झाला होता खून
वृत्तसंस्था/ रोहतक
हरियाणाच्या रोहतकमध्ये काँग्रेस नेत्या हिमानी नरवालच्या हत्येनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हिमानीचा मृतदेह रोहतकच्या सांपला बसस्थानकावर एका सूटकेसमध्ये मिळाला होता. 22 वर्षीय काँग्रेस नेत्या हिमानी 5 महिन्यांपासून रोहतकच्या विजयनगर येथील स्वत:च्या घरात एकटीच राहत होती.
हिमानी ही तीन दिवसांपासून बेपत्ता होती असे पोलिसांकडून सांगण्यात आले. हिमानीचे वडिल शेर सिंह यांनी 10 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. तर 12 वर्षांपूर्वी तिच्या मोठ्या भावाची हत्या करण्यात आली होती. यानंतर हिमानीच्या आई सविता यांनी मुलीला तसेच छोट्या मुलाला घेत दिल्लीत राहण्यास सुरुवात केली होती. सविता या बीएसएफमध्ये कार्यरत आहेत. त्यांना पतीच्या जागी नोकरी मिळाली होती.
मोबाइलचा शोध सुरू
हिमानीचा मोबाइलही गायब आहे. पोलीस तिच्या मोबाइलचा शोध घेत आहेत. तिचे अखेरचे लोकेशन, तिने कुणा-कुणाशी संपर्क साधला होता हे शोधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच रोहतक येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पडताळून पाहिले जात आहे.
काँग्रेसकडून एसआयटीची मागणी
हिमानी नरवाल ही काँग्रेसमध्ये सक्रीय होती आणि राजकीय कारकीर्दीची सुरुवात तिने विद्यार्थीदशेतून केली होती. भारत जोडो यात्रेत तिने भाग घेतला होता आणि राहुल गांधींसोबतची तिची छायाचित्रे चर्चेत राहिली होती. हिमानीचे वाढते राजकीय महत्त्व तिच्या हत्येचे कारण ठरल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी तिच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात यावी असे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसच्या एखाद्या नेत्याचा हात?
माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोहतकमध्ये तिचा मृतदेह आढळून आल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. संबंधित सूटकेस आमच्याच घरातील आहे. मारेकील काँग्रेस पक्षातील एखादा नेता असू शकतो, हिमानीचे राजकारणातील यश पाहता काँग्रेस नेत्यांमध्ये ईर्ष्या निर्माण झाली असावी असे तिचा भाऊ जतिनने म्हटले आहे.









