चिपळूण :
मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे रुग्णालयाच्या बंदावस्थेत असलेल्या रुग्णवाहिकेला आग लागल्याची घटना शनिवारी ४.२५ वाजता घडली. चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनीही धाव घेतली.
कामथे रुग्णालयाच्या २ रुग्णवाहिका गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त असल्याने त्या बंदावस्थेत आहेत. या दोन्ही रुग्णवाहिका रुग्णालयाच्या मागील बाजूस ठेवण्यात आल्या आहेत. असे असताना त्यातील एका रुग्णवाहिकेला शनिवारी दुपारी ४.२५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यावेळी तत्काळ चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत ही आग अधिक भडकली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल होताच त्यांनी काही मिनिटाच ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केला. अखेर अग्निशमन दलाचे कर्मचारी अमोल नामुष्टे, देवदास गावडे, शुभम चिवेलकर, गुरुराज वंजारे या कर्मचाऱ्यांनी १० ते १५ मिनिटे केलेल्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.
नेमक्या कोणत्या कारणातून रुग्णवाहिकेला ही आग लागली असावी, याचे स्पष्ट कारण पुढे आले नसले तरी त्या ठिकाणी कचरा जळत होता. त्यातून ही आग लागली असावी, असेही बोलले जात आहे. या घटनेची माहिती चिपळूण पोलीस ठाण्यास समजल्यानंतर पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.








