कोल्हापूर :
जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बनावट धनादेश तसेच जिल्हा परिषदेचे बोगस शिक्के आणि कागदपत्रांच्या आधारे जिल्हा परिषदेचा 57 कोटी रुपयांना गंडा घालण्याचा प्रयत्न झाला होता. या फसवणूक प्रकरणातील तीन कंपन्या बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जिल्हा बँकेच्या धनादेश छपाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असून, यासाठी लवकरच एक स्वतंत्र्य पथक मुंबईला जाणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बनावट धनादेश तयार करुन त्याआधारे जिल्हा परिषदेला 57 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामध्ये जिल्हा परिषदेचे बनावट शिक्के तसेच वित्त लेखापालाची बोगस सही करण्यात आल्याचेही समोर आले होते. दरम्यान या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांचे एक पथक मुंबई येथे तीन दिवसांपासून ठाण मांडून आहे. धनादेश जमा झालेल्या फोकस, जीसीएसएसपी आणि ट्रिनिटी कंपन्यांच्या बँक खात्यांचे तपशील पोलिसांना मिळाले. सानपाडा येथील आयसीआयसीआय आणि आयडीएफसी बँकेसह वाशी येथील कोटक बँकेच्या शाखेतून तिन्ही खात्यांचे पत्ते, मोबाइल नंबर पोलिसांच्या हाती लागले. तिन्ही कंपन्यांचे पत्ते उत्तर भारतातील एका शहरातील एकाच ठिकाणचे आहेत. खात्यांवरील आर्थिक व्यवहार संशयास्पद आहेत. त्यावरून तिन्ही कंपन्या बनावट असून, केवळ फसवणुकीसाठीच त्या कागदोपत्री दाखवल्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे. तरीही याची खात्री करण्यासाठी लवकरच एक पथक उत्तर भारतात जाणार असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार यांनी दिली. धनादेश भरण्यासाठी बँकांमध्ये गेलेल्या संशयितांचेही फुटेज पोलिसांना मिळाले आहे.
- केडीसी बँकेच्या त्या कर्मचाऱ्यांचीही होणार चौकशी
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धनादेशांची छपाई मुंबई येथे होते. छपाई करणाऱ्या मुद्रणालयामध्ये 40 कर्मचारी आहेत. पोलिसांनी संबंधित मुद्रणालयात जाऊन गेल्या महिनाभरात केलेल्या धनादेशांच्या छपाईची माहिती घेतली. यातील सहा कर्मचारी गोपनीय विभागात काम करतात. त्यांच्या चौकशीसाठी एक स्वतंत्र पथक लवकरच मुंबईला जाणार आहे. या पथकाकडून धनादेशाची सविस्तर माहिती बाहेर कशी गेली याची चौकशी करण्यात येणार आहे.
- स्थानिकांचा सहभाग असल्याची शक्यता
मुंबईतील तीन बँकांमध्ये धनादेश जमा करणाऱ्या संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले. त्यावरून संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली. दरम्यान, बाहेरच्या भामट्यांना मदत करणाऱ्या स्थानिक साथीदारांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.








