डॉ. शरद बाविस्कर यांचा पालकांशी संवाद : मुलांवर घातलेली अतिबंधने-अपेक्षा किंवा अतिस्वातंत्र्य घातक असल्याचे मत
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी विद्यानिकेतन येथे तत्त्वज्ञ व साहित्यिक डॉ. शरद बाविस्कर यांनी ‘शिक्षणातील सौंदर्यशास्त्र’ या विषयावर पालकांशी संवाद साधला. ते म्हणाले, मातृभाषेतून शिक्षणाचा अट्टहास धरावा लागेल. मातृभाषे व्यतिरिक्त इतर भाषेत शिकणारी मुले एकही भाषा नीट बोलू शकत नाहीत. मुलांवर घातलेली अतिबंधने व अपेक्षा किंवा अतिस्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी घातक आहेत.
मुलांनी काय व्हायचे हे पालकच ठरवतात. पालकांनी कागद आणि रंग देण्याचे काम करावे पण चित्रे त्याची त्याला काढू द्यावी. घरातील टीव्ही मोठा आहे पण वाचनालय छोटे पेंवा अजिबात नाही, असे चित्र आहे. हे चित्र उलट होईल तेव्हा मुले चौफेर ज्ञान मिळवतील. शिक्षकांनीसुद्धा भरपूर वाचन करावे व आपल्यातील संशोधक व सृजनशीलता सतत जागृत ठेवावी, असे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये सुभाष ओऊळकर म्हणाले, शिक्षणातील बदल स्वीकारणे काळाची गरज आहे. मातृभाषेतून शिक्षण ही संकल्पना अधिक जोमाने पुढे नेली पाहिजे. या चर्चासत्रासाठी विद्यानिकेतन व प्रबोधिनीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.









