पाच जणांविरुद्ध उद्यमबाग पोलिसात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ बेळगाव
फॅशन मार्केटिंगमध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपावरून येथील उद्यमबाग पोलीस स्थानकात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हुदली, ता. बेळगाव येथील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कीर्ती बसवाणेप्पा हुदली यांनी फिर्याद दिली आहे. संजू, पवित्रा, बसवराज अंगडी, कीर्ती चिदानंद व काव्या यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 109, 316 (2), 318(2), 318(4) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक डी. के. पाटील पुढील तपास करीत आहेत. ‘चेंज युवर लाईफ’ फॅशन मार्केटिंग कंपनीत नोकरी देण्याचे सांगून फसवणूक करण्यात आली आहे. कीर्ती यांना बोलावून घेऊन चार दिवस प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर कंपनीच्या कामासाठी तुमची निवड झाली आहे. त्यासाठी 47,500 रुपये जमा करा, असे सांगण्यात आले. रक्कम जमा केल्यानंतर तुम्ही आणखी तिघा जणांची कंपनीत तुमच्यामार्फत भरती करा, मग तुम्हाला पगार सुरू होईल, असे सांगण्यात आले.
त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून कीर्ती यांनी आपल्या परिचयातील आणखी एकाला बोलावून आणले. त्यावेळी त्यांच्या बँक खात्यात 2,940 रुपये जमा करण्यात आले. पगार तर नाहीच, नोकरीसाठी दिलेले 47,500 रुपये पण परत करण्यात आले नाहीत. म्हणून शेवटी कीर्ती यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आहे. उद्यमबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.









