कॉपीराईट अॅक्टअंतर्गत होऊ शकते कारवाई : निपाणीतील मंडळावर प्रतिबंध
प्रतिनिधी/ बेळगाव
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या सिनेमाने सिनेरसिकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे हा सिनेमा दोन आठवड्यांनंतरही हाऊसफुल्ल चालत आहे. परंतु, काही युवक मंडळे हा चित्रपट गल्लोगल्ली पडद्यावर दाखवत आहेत. हा कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा असून निपाणी येथे पडद्यावर दाखविण्यात येणारा चित्रपट बंद पाडण्यात आला.
कोट्यावधी रुपये खर्च करून ‘छावा’ सिनेमा तयार करण्यात आला आहे. सध्या हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. असे असताना बेळगाव परिसरातील काही मंडळांमध्ये हा चित्रपट पडद्यावर दाखविण्यावर रस्सीखेच सुरू आहे. प्रोजेक्टरचा वापर करून गल्लोगल्ली पडद्यांवर हा चित्रपट दाखविण्यात येत आहे. बेळगाव शहरातही दोन दिवसांपूर्वी एका गल्लीत ट्रॅक्टरवर पडदा उभारून चित्रपट दाखविण्यात आला आहे. कॉपीराईट अॅक्टनुसार असे करणे हा गुन्हा ठरत असल्याने युवक मंडळांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
कायदेशीर कारवाई शक्य
‘छावा’ सिनेमा सर्वत्र हाऊसफुल्ल सुरू आहे. परंतु, या सिनेमाचे रेकॉर्डिंग करून ते गल्लोगल्ली पडद्यावर दाखविण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. निपाणी येथे अशीच तक्रार आल्यानंतर चित्रपट बंद पाडून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. चित्रपटाचे हक्क आमच्याकडे असल्याने कोणीही असे प्रकार करू नयेत. अन्यथा कॉपीराईट अॅक्टनुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती ‘छावा’ चित्रपटाचे डिस्ट्रीब्युटर रायकर व्हेंचर्स, हुबळीचे प्रमुख किशोर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
कॉपीराईट म्हणजे काय?
एखादा सिनेमा अथवा गाणे तयार झाल्यानंतर संबंधित निर्माता, तसेच दिग्दर्शक हे त्याचे हक्क अबाधित ठेवतात. त्यांना ज्यावेळी वाटेल त्यावेळी एखाद्या म्युझिक कंपनी अथवा प्रोडक्शन हाऊसला ते हक्क विक्री करतात. परंतु, सिनेमागृहात कॅमेरा लावून चित्रिकरण करणे, सोशल मीडिया वेबसाईट्समधून चित्रपट डाऊनलोड करून तो शेअर करणे, चित्रपटातील कथानक जशास तसे वापरणे, गाण्यांचा वापर करणे हा कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे संबंधित निर्माते अथवा डिस्ट्रीब्युटरची परवानगी घेऊनच तो चित्रपट दाखवला जाऊ शकतो.









