काल परत एकदा पावसाने अडथळा आणला. आणि जिथे नेहमीच ऑस्ट्रेलियाबद्दल म्हटले जाते की पाऊस चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांची डोकेदुखी ठरली आहे. परंतु त्याच पावसाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या उपांत्य फेरीत पोहचवले. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका जवळपास उपांत्य फेरीत पोहचेल अशी आपण अपेक्षा करूया. (मोठ्या फरकाने जर आफ्रिकेचा पराभव झाला तरच उलथापालथ होऊ शकते). एका आठवड्यानंतर भारताचा आज किविंशी सामना होणार आहे. दोन संघांनी विशेष प्रावीण्यासह या स्पर्धेत खेळ केला आहे. औपचारिकता एवढीच आहे की या स्पर्धेत टॉपर कोण?
मागच्या सामन्यात शुभमन गिल काहीसा लंगडताना दिसत होता. प्रदीर्घ विश्रांतीनंतर तो फिट असेल अशी आपण अपेक्षा करूया. या सामन्यात विजय मिळवत गटामध्ये टॉपर राहण्याचा प्रयत्न भारत निश्चित करणार. तसे झाल्यास भारताचा आत्मविश्वास हा अधिक वाढेल यात काही शंका नाही. पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंग संघात नव्हता, त्यावेळी बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याच्या जागेवर हर्षित राणाने आपलं काम चोख बजावलं. न्यूझीलंडचा विचार केला तर पहिल्या सामन्यात टॉम लॅथम, यंग यांनी दर्जेदार शतके झळकावली. दुसऱ्या सामन्यात रचिन रवींद्रने शतक झळकावलं. या स्पर्धेत भारता पाठोपाठ जर कोणी चांगली कामगिरी केली असेल तर तो आहे न्यूझीलंड संघ.
या सामन्यातील पराभूत संघाला फारसा मोठा फरक पडणार नाही. भारताचा विचार केला तर सलग दोन विजय मिळवून भारताने विजयाचा जो रतीब टाकला आहे तो रतीब कायम ठेवण्याचा प्रयत्न भारतीय संघ निश्चित करेल. जो सूर भारताला सुरुवातीपासून मिळालाय तो भारताने कायम ठेवणे गरजेचे आहे. हा सामना वगळता भारताचे दोन विजय आणखी एका विश्वविजेतेपदाला गवसणी घालणारे असतील. त्यामुळे संघात बदल करायचा की नाही हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल.
या स्पर्धेच्या माध्यमातून जोस बटलरला आपली खुर्ची खाली करायला लागली. लाजिरवाणा पराभव एखाद्या कर्णधाराची कशी विकेट काढू शकतो हे या स्पर्धेने दाखवून दिले. दुसरीकडे पदाची खुर्ची सोडण्याचं टायमिंग कसं साधावं हे तुम्ही राहुल द्रविड यांना विचारा. पूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाजी तळपतेय. गोलंदाजीचा विचार केला तर कुलदीप यादव भारतासाठी कुलदीपक ठरतोय. दोन्ही सामन्यात ऐन मोक्याच्या क्षणी त्याने गडी बाद केलेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचा विचार केला तर हा सामना जरी महत्त्वाचा नसला तरी पराभव स्वीकारून या स्पर्धेत शरीराला खरचटून निश्चितच घ्यायचं नसेल.
2023 विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक सामन्यात स्पेशल चहाचा आस्वाद घेत आलो. शेवटचा सामना आपल्यासाठी दुधाविना राहिला होता, असो. भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची असेल तर विजयाची विहीर सतत भरलेली पाहिजे. उद्याच्या सामन्यावर पकड मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जवळ जाण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी न्यूझीलंडवरचा विजय आवश्यक आहे, एवढं मात्र खरं!









