वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय संघातील भरशाचा फलंदाज विराट कोहली अद्याप धावांसाठी भुकेलेला असून तो भविष्य काळात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम मागे टाकेल, असा विश्वास माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक लालचंद रजपूतने व्यक्त केला आहे.
सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतकांचे शतक नोंदवून जागतिक विक्रम केला असून तो अद्याप अबाधित राहिला आहे. पण विराट कोहली अद्याप अधिक धावांसाठी नेहमीच उताविळ असल्याने तो सचिनचा हा विक्रम मागे टाकेल असा विश्वास रजपूतने व्यक्त केला आहे. सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत गेल्या रविवारी दुबईमध्ये झालेल्या पाक विरुद्धच्या सामन्यात कोहलीने दमदार नाबाद शतक झळकावून आपल्या संघाला दणकेबाज विजय मिळवून दिला होता. मध्यंतरी कोहलीने फलंदाजीचा फॉर्म गमविला होता आणि काही सामन्यांमध्ये तो फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत होता. पण पाक विरुद्धच्या सामन्यात कोहलीला पुन्हा सूर मिळाल्याचे जाणवते. आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत कोहलीने पाचवे स्थान मिळविले आहे. तसेच त्याने वनडे क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा फलंदाज आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगला मागे टाकले आहे. आता सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेला लंकेचा कुमार संगकारा याला मागे टाकण्यासाठी कोहलीला 149 धावांची गरज आहे. तर या यादीमध्ये सचिन तेंडुलकर अग्रस्थानावर असून त्याचा विक्रम अद्याप मोडला गेलेला नाही.
कोहलीची क्रिकेट कारकिर्दीत अद्याप संपलेली नाही. आणखी काही वर्षे तो या क्षेत्रात चांगली कामगिरी करेल. आता चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत रविवारी भारताचा सामना न्यूझीलंडबरोबर दुबईत खेळविला जाणार आहे. विराटचा ही वनडे क्रिकेट प्रकारातील 300 वा सामना आहे.









