फेब्रुवारीमध्ये तिजोरीत 1.84 लाख कोटी जमा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीमध्ये एकूण जीएसटी संकलन 9.1 टक्क्यांनी वाढून 1.84 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. देशांतर्गत व्यवहारांमुळे मिळणाऱ्या महसुलामुळे एकूण संकलन वाढल्याची माहिती देण्यात आली. तथापि, यापूर्वीच्या म्हणजेच जानेवारी महिन्यात 1.96 लाख कोटी इतका जीएसटी जमा झाला होता.
फेब्रुवारी महिन्यात सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंतर्गत देशांतर्गत महसूल 10.2 टक्क्यांनी वाढून 1.42 लाख कोटी रुपये झाला. तर आयात महसूल 5.4 टक्क्यांनी वाढून 41,702 कोटी रुपये झाला. आकडेवारीनुसार, केंद्रीय जीएसटीमधून 35,204 कोटी रुपये, राज्य जीएसटीमधून 43,704 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटीमधून 90,870 कोटी रुपये आणि भरपाई उपकरातून 13,868 कोटी रुपये वसूल झाले. फेब्रुवारीमध्ये एकूण 20,889 कोटी रुपयांचे परतावे जारी करण्यात आले असून ते मागील वर्षाच्या तुलनेत 17.3 टक्क्यांनी जास्त आहेत.
जीएसटी संकलनातील वाढ अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाची शक्यता दर्शवते. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक आर्थिक आव्हानांना जोरदारपणे तोंड देत आहे. आयातीशी संबंधित संकलनाच्या तुलनेत देशांतर्गत जीएसटी महसुलात सातत्यपूर्ण वाढ ही देशांतर्गत पातळीवर ताकद दर्शवते.
गेल्या काही महिन्यांमध्ये जीएसटी संकलनात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जानेवारीपासून जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. चार महिने एकेरी अंकात राहिल्यानंतर जानेवारीमध्ये तो नऊ महिन्यांच्या उच्चांकी 12.3 टक्क्यांवर पोहोचला. जीएसटी संकलन 1.7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आकडा गाठण्यात फेब्रुवारी महिनाही सफल ठरला आहे. परतावा वजा केल्यानंतरही जीएसटी गणना गेल्यावर्षीपेक्षा 8.1 टक्के जास्त आहे. परतफेडीची रक्कम कापल्यानंतर ती 1.63 लाख कोटी रुपये झाली. फेब्रुवारी 2024 मध्ये एकूण 1.68 लाख कोटी रुपये आणि निव्वळ जीएसटी महसूल 1.50 लाख कोटी रुपये होता.
विकासदरातही सुधारणा
28 फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार तिसऱ्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था सुधारली आहे. विकासदर गेल्या महिन्यात 5.6 टक्क्यांवरून 6.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. 6.5 टक्के वाढीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेला चौथ्या तिमाहीत 7.6 टक्के दराने वाढ करावी लागेल.









