वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जुन्या वाहनांच्या विरोधात मोठे अभियान हाती घेतले आहे. जी स्वयंचलित वाहने 15 वर्षांहून जुनी असतील, त्यांना 31 मार्चनंतर पेट्रोल दिले जाणार नाही, अशी घोषणा राज्याचे पर्यावरण संरक्षण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी शनिवारी केली. दिल्लीत वायूप्रदूषणाची समस्या मोठी असून ती नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सिरसा यांनी शनिवारी दिल्लीतील वाहतूक अधिकाऱ्यांच्या एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी या निर्णयाच्या क्रियान्वयनाच्या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीत दिल्लीतील वायूप्रदूषणाच्या समस्येवर अधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली. दिल्लीतील पेट्रोल पंपांवर 15 वर्षांहून अधिक जुने वाहन पेट्रोल घेण्यासाठी आल्यास ते ओळखणारी साधने प्रत्येक पेट्रोल पंपावर बसविण्यात येईल, असेही सिरसा यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले.
आश्वासनाची पूर्ती करणार
दिल्लीच्या विधानसभा निवडणूक काळात भारतीय जनता पक्षाने दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले होते. आता दिल्लीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. दिलेली सर्व आश्वासने लवकरात लवकर पूर्ण केली जातील, असे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व नवे मंत्री जोमाने कामाला लागले असून यमुना नदीचे शुद्धीकरण आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण या दोन प्रकल्पांवर प्रथम भर दिला जाणार आहे. जुन्या वाहनांमुळे अधिक प्रमाणात प्रदूषित वायू वातावरणात उत्सर्जित केले जातात. त्यामुळे जुन्या वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.









