चिपळूण :
आर्थिक वर्ष संपण्याला एकच महिना शिल्लक असल्याने नगर परिषदेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा वेग वाढवला आहे. आतापर्यंत 9 कोटी 58 लाख 65 हजार रुपयांची वसुली झाली आहे. वसुलीचे प्रमाण 52 टक्के असून अजून 48 टक्के वसुली बाकी आहे. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 1 मार्चपासून धडक कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्यात थकितदारांची नळकनेक्शन तोडली जाणार असून लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
न.प.ला मालमत्ता व पाणीपट्टी करातून थकित व चालू वर्षाची मिळून 18 कोटी 33 लाख 81 हजार 537 ऊपयांची वसुली अपेक्षित आहे. त्यापैकी आजपर्यंत 9 कोटी 58 लाख 65 हजार 102 रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे अजून 48 टक्के वसुली बाकी आहे. यामुळे ही वसुली पूर्ण करण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी तथा कर वसुली अधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर आदी अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. नागरिकांना कराची रक्कम सहज भरता यावी, यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नागरी सुविधा केंद्र सुट्टीच्या दिवशीही अभिलेख व भांडार विभागप्रमुख वलिद वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू ठेवले जात आहे. यामुळे काही नागरिक कर भरून सहकार्य करीत असतानाच काही नागरिक मात्र वेगवेगळी कारणे देऊन कर भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे 1 मार्चपासून धडक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पाणी विभागाचे प्रमुख, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली थकितदारांची नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. तसेच लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याची तयारीही प्रशासन करीत आहे. ही कारवाई करताना गरज भासल्यास पोलीस बंदोबस्तही घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
- कटू कारवाई टाळावी
कर वसुली वाढावी यासाठी शासन सातत्याने परिपत्रके पाठवत आहे. वसुली कमी झाल्यास त्याचा मोठा परिणाम नगर परिषदेला अनुदान मिळण्यात होतो. त्यामुळे नागरिकांनी कर भरून सहकार्य करावे. तसेच नळकनेक्शन तोडणे व मालमत्ता जप्तीची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन चिपळूण नगर परिषद मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.








