कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
बालचमुंनी कोल्हापुरातील विज्ञान प्रदर्शनात प्रकल्प सादर केले. या माध्यमातून अटल टिंकरिंग लॅब असलेल्या शाळांमधील आठ प्रकल्पांची निवड लँड ए हँड इंडियाने केली आहे. बालचमुंच्या या प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्राकडे पेटंटसाठी प्रस्ताव पाठवले जाणार आहेत. त्यांना पेटंट मिळाले तर बालवैज्ञानिकांच्या प्रकल्पांचे स्टार्टअपमध्ये रूपांतर होणार आहे. प्रायव्हेट हायस्कूलच्या बालवैज्ञानिकांनी बनवलेल्या ‘अविरत ज्योत’च्या माध्यमातून देवाच्या चरणी वाहिलेल्या तेलाचा साठा होणार आहे.
नवरात्रोत्सवात तेल वाहण्याची परंपरा आहे. भाविकांनी देवाला वाहिलेल्या तेलाचा अपव्यय टाळण्यासाठी प्रायव्हेट हायस्कूलच्या बालवैज्ञानिकांनी संशोधनाअंती ‘अविरत ज्योत’ तयार केली आहे. या ज्योतीमध्ये तेल ओतल्यानंतर ते ज्योतीच्या खालील टँकमध्ये त्याचा साठा होणार आहे. बालचमुंचा हा प्रकल्प पेटंटसाठी पाठवला जाणार आहे. त्यामुळे बालवैज्ञानिकांचे कौतुक होत आहे.
नवरात्रोत्सवात देवतांना तेल वाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. त्यामुळे तेल दिव्यात अनेकदा पडत नाही. त्यामुळे पुजारी तेलाच्या साठ्यासाठी वेगळे भांडे ठेवतात. ही अडचण लक्षात घेऊन प्रायव्हेट हायस्कूलच्या विज्ञान शिक्षिका चैत्राली पुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रकल्प केला. मंदिरात दिवा लावण्यासाठी छोटी समई तयार केली आहे. या समईत वारंवार तेल ओतण्याची गरज नाही. बटन दाबले की तेल वर येईल, अशी त्याची रचना आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण शहर, जिल्हा पातळीवरील विज्ञान प्रदर्शनात केले. अटल टिंकरिंग लॅब असल्याने लॅन्ड ए हॅन्ड इंडियाचे या प्रकल्पाला प्रथम पारितोषिक मिळाले. इशान महालकरी, मयुरेश पाटील, अंजली भद्रे, कस्तुरी चव्हाण, शाशिया सय्यद, आरूष आनवेकर या विद्यार्थ्यांनी ते शिक्षिका चैत्राली पुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
- नागोजीराव पाटणकर हायस्कूलचे कार पार्किंग
विद्यार्थ्यांनी ऑटोमॅटिक कार पार्किंग प्रकल्प सादर केला आहे. या प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ऑर्डिनोचा वापर करून ऑटोमॅटिक कार पार्किंग सिस्टीम तयार केली आहे. ही स्वयंचलित कार पार्किंग नियंत्रण प्रणाली आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचे वाहन कोणत्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय सहजपणे पार्क करू शकता. या प्रकल्पामुळे पार्किंगची जागा रिकामी झाल्याचे ओळखता येते. एलसीडी डिस्प्लेद्वारे सर्व परिणाम दर्शवले जातात. यासाठी आयआर सेन्सर्स, ब्रेडबोर्ड, सर्वो मोटर, 16 बाय 2 एलईडी, जम्पर वायर्स, ऑर्डिनो युनो, ऑर्डिनो सॉफ्टवेअरचा वापर केला आहे. एखाद्या पार्किंगची 50 कारची क्षमता असेल तर इतर कारमालकांना पार्किंगमधून फिरून परत यावे लागते. ही सदस्या दूर करण्यासाठी पार्किंगच्या दारात स्क्रिनवर पार्किंगसाठी जागा आहे का, हे समजणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पेटंटसाठी निवडला आहे.
- अटल टिंकरिंग लॅबमधील 8 प्रकल्पांची निवड
शालेय जीवनापासूनच संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी अनेक शाळांना अटल टिंकरिंग लॅब दिली आहे. त्यांतर्गत नवनवीन प्रकल्प पुढे येत आहेत. शालेय स्तरावर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या हेतूने बाल वैज्ञान प्रदर्शन भरवण्यात येते. यात अटल टिंकरिंग लॅब असलेल्या शाळांनी उत्कृष्ट प्रकल्प सादर केले. त्यामुळे जिल्हा परिषद व लॅन्ड ए हॅन्ड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात 130 अटल टिंकरिंग शाळांमधील 175 प्रकल्प सहभागी झाले. यापैकी 8 प्रकल्प राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवडल. त्यांचे पेटंटसाठी प्रस्ताव पाठवले जाणार आहेत.








