कोल्हापूर :
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची दिवस–रात्र वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानक परिसरात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र यातील केवळ चार कॅमेरे सुरु आणि चार बंद आहेत. तर बसस्थानकात एक पोलीस कर्मचारी आणि दोन एसटी सुरक्षा कर्मचारी अशा तिघांना बंदोबस्तासाठी तैनात केले आहे. अपुऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमुळे प्रवशांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा आहे. याचा गैरफायदा टवाळखोर आणि नशेबाजांकडून घेतला जात असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणखी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून कोल्हापूर जिह्यासह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, मुंबई आणि कर्नाटक व गोवा राज्यात एसटी बसची दिवस–रात्र वाहतूक सुऊ असते. या ठिकाणाहुन दररोज सुमारे 50 हजार प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या तुलनेत उपलब्ध असणारी सुरक्षा अगदीच तोकडी आहे. त्यामुळे स्थानकात दिवस–रात्र मद्यपी, नशेखोर तरुण भटकत असल्याचे दिसून येते. असे तरुण दुचाकीवऊन स्थानकात येतात वाटेल तेथे वाहने उभी करतात. प्रवाशी महिला, मुलींची टिंगळटवाळी करतात.
- बसस्थानक अनेक समस्येच्या गर्तेत
या बसस्थानाकतून एसटीला वर्षाला 90 कोटी 17 लाख 53 हजार 998 ऊपयांचे उत्पन्न मिळत आहे. या स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुऊ आहे. त्यामुळे एसटी वाहतुकीला अडथळा होत आहे. येथील हिरकणी कक्ष बंद आहे. त्यामुळे माता–बालकांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर परिसरातील काही विद्युत पोलवरील दिवे बंद असल्याने, रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. परिसरात उभी केलेली अस्ताव्यस्त वाहनांमुळे बस वाहतुकीला अडथळा होतो. यातून अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवले आहेत.
- बसस्थानकात पोलीस चौकी सुरु
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यवर्ती बसस्थानक येते. येथील प्रवाशांची संख्या लक्ष्यात घेवून, महिन्यापूर्वी बसस्थानकात पोलीस चौकी सुऊ केली आहे. येथे 24 तास पोलीस असतात. तसेच आम्ही स्वत: गस्त घालत असतो. पुणे येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस चौकीतील दिवस दोन आणि रात्री दोन पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात केले आहेत.
– संतोष डोके, पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस ठाणे
- मुंबई, पुणे बस फ्लॉटफार्ममध्ये पोलीस केबीनची गरज
मुंबई आणि पुण्याकडे धावणाऱ्या एसटीसाठी स्वतंत्र बसस्थानक आहे. या ठिकाणी गर्दी असल्याने चोरट्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या स्थानकात पोलिसांसाठी केबीन उभी करणे आवश्यक आहे.








