कोल्हापूर :
दुचाकी चोरणाऱ्या दोघा तरुणांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक करुन चोरीच्या 7 दुचाकी जप्त केल्या. लक्ष्मीपुरी, करवीर, जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबूली या दोघांनी दिली. राहूल शिवाजी साळूंखे (वय 20, रा. बीड शेड फाटा, करवीर) व राधेय अनिल पाथरूट (21, रा. दौलतनगर) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित साळूंखे व पाथरूट हे लक्षतीर्थ वसाहतीतून एक दुचाकी ढकलून नेत होते. यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे एक पथक या परिसरात गस्त घालत होते. पोलीस अंमलदार प्रितम मिठारी, मंगेश माने, तानाजी दावणे, किशोर पवार यांनी त्यांना अडवले. त्यांच्या ताब्यातील दुचाकीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला. साळूंखे व पाथरूटला ताब्यात घेऊन चौकशी केली असता दुचाकी चोरल्याचे सांगितले.
पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी संशयितांकडे कसून चौकशी केली असता चोरट्यांनी सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीच्या सर्व दुचाकी जप्त केल्या. संशयितांना न्यायालयात हजर केले असता 3 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.








