कोल्हापूर :
बनावट धनादेशाद्वारे जिल्हा परिषदेची 57 कोटी 4 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक टळली असली तरी या घटनेची जिल्हा परिषद प्रशासनाकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी सीईओ कार्तिकेयन एस. यांनी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. या समितीने चौकशी करून त्याबाबतचा अहवाल 10 मार्चपर्यंत सादर करण्याचे निर्देश सीईओंनी दिले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाबरोबरच जि. प. पातळीवर देखील या घटनेची चौकशी होणार असून त्यामध्ये वित्त विभागातीलच कोणी सामील आहे का, याची कसून चौकशी केली जाणार आहे.
बनावट धनादेशाद्वारे जि. प. ला गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. लेखाधिकारी कृष्णात पाटील यांना गुन्हा नोंदवण्यासह तपासातील पुढील कामासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. सध्या शाहूपुरी पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असली तरी जिल्हा परिषदेकडूनही त्याची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे.
- अशी आहे समिती
स्थानिक निधी लेखा विभागाचे सहाय्यक संचालक सुशीलकुमार केंबळे हे या समितीचे अध्यक्ष असून कोषागार अधिकारी अश्विनी नराजे या सदस्य आहेत. तर जि. प. च्या पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प अधिकारी माधुरी परीट या समिती सचिव आहेत. या समितीला चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे.








