सरकार पक्षातर्फे आरोप सिद्ध करता न आल्याने न्यायालयाचा निकाल
बेळगाव : महाराष्ट्र राज्य येळ्ळूर खटला क्र. 306 मधून 39 जणांची द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सरकार पक्षातर्फे आरोप सिद्ध करता न आल्याने न्यायाधीश पंकजा हुन्नूर यांनी शुक्रवार दि. 28 रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 7 पैकी आतापर्यंत 3 खटल्यांमध्ये कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता झाली असून उर्वरित 4 खटल्यांची सुनावणी सुरू आहे.
कुमार मासेकर, सागर पाटील, केदारी पाटील, प्रकाश कुगजी, उमेश कुगजी, अशोक कुगजी, अभिजीत नायकोजी, शामला जाधव, मालन जाधव, सरिता जाधव, शांता कुगजी, अर्चना जाधव, शेवंता कुगजी, तुळसा शिंदे, लक्ष्मी राजाराम, सविता खादरवाडकर, परशराम कुगजी, नंदू कुगजी, जयश्री खादरवाडकर, लक्ष्मी पोटे, सुनीता मुतगेकर, मनीषा टक्केकर, अंजना घाडी, सुनीता धामणेकर, नितीन कुगजी, राहुल अष्टेकर, रेखा संभाजीचे, ललिता संभाजीचे, सरस्वती कलमठ, लक्ष्मी कुगजी, गंगव्वा चिकमठ, रेणुका हंपन्नावर, महेश जाधव, रेखा हंपन्नावर, रेश्मा मासेकर, अर्चना कुगजी, सविता चिकमठ, रेखा नंदी, नंदा बेडके सर्वजण रा. येळ्ळूर अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. या खटल्यात एकूण 43 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी मनोज नायकोजी, मीरा नायकोजी, सुनील कुगजी या तिघांना यापूर्वीच न्यायालयाने खटल्यातून वगळले आहे. तर संपत कुगजी यांचे निधन झाल्याने वरील 39 जणांवर हा खटला सुरू होता.
येळ्ळूर गावच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य फलक 25 जुलै 2014 रोजी जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटविला. त्यामुळे येळ्ळूरसह सीमाभागात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फलक काढण्यात आल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी फलक उभारून ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या सात गुन्ह्यांमध्ये अनेकजणांना अडकविले. गुन्हा क्र. 306 मध्ये 43 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. येळ्ळूर ते वडगाव दरम्यानच्या रोडवर गणपती मंदिर येथे पंधराशे ते दोन हजार जणांनी रस्त्यावर झाड आडवे टाकण्यासह लोकांना ये-जा करण्यास रस्ता बंद केला. त्यामुळे याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागल्याचा ठपका ठेवत होळ्याप्पा भीमाप्पा सुलधाळ, रा. मार्कंडेयनगर यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी 43 जणांविरोधात गुन्हा दाखल करून घेऊन न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. त्यामुळे या खटल्याची सुनावणी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात सुरू होती. पण सरकारतर्फे आरोप सिद्ध करता न आल्याने न्यायालयाने शनिवारी सर्वांची निर्दोष मुक्तता केली. कार्यकर्त्यांतर्फे अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर, अॅड. शाम पाटील यांनी काम पाहिले.









